बेस्टच्या ‘या’ चार आगारातील हजारो प्रवाशांची परवड, खासगी वाहनांवर भिस्त

Best
बेस्ट बस

मुंबई – बेस्टच्या ताफ्यातील भाडे तत्त्वावरील बसगाड्यांना एकापाठोपाठ एक आगी लागण्याच्या तीन घटना एकाच महिन्यात घडल्याने बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने बस पुरवठादार ‘मातेश्वरी’ कंपनीच्या ४१२ बसगाड्यांची सेवा सुधारणा समाधानकारक होईपर्यंत गुरुवारपासून बंद केली आहे. मात्र बेस्टने २९७ बसगाड्यांची पर्यायी सेवा उपलब्ध केली, असे असले तरी प्रमुख चार आगारातून ३६ मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुरेशी बससेवा नसल्याने कमी – अधिक प्रमाणात हाल झाले. काही प्रवाशांनी रिक्षा, टॅक्सी आदी वाहनांचाही वापर केल्याचे समजते.

हेही वाचा – बेस्टच्या ताफ्यातील ४०० सीएनजी बसच्या सेवा तात्पुरत्या बंद

बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांना आगी लागण्याच्या घटना एका महिन्यात तीन वेळा घडल्या. २५ जानेवारी रोजी बेस्टच्या भाडे तत्त्वावरील एका बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा ११ फेब्रुवारी रोजीही अंधेरी (पूर्व) चकाला जंक्शन येथेही आणखीन एका बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी बस चालक, वाहक व ७ प्रवासी बचावले होते. त्यानंतर आता पुन्हा तिसऱ्यांदा म्हणजे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता अंधेरी (पूर्व) , आगरकर चौक येथे भाडे तत्त्वावरील बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. सदर घटनेपूर्वीच बसमधील ७० – ८० प्रवासी उतरल्याने पुढील अनर्थ टळला.

मात्र बसला आगी लागण्याच्या लागोपाठ तीन घटना घडल्याने बेस्ट प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. दुर्दैवाने या तिन्ही बस गाड्यांचा भाडेतत्वावर पुरवठा करणाऱ्या मातेश्वरी या कंपनीच्या असल्याने सदर कंपनी बेस्टच्या रडारवर आली. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी, कालच्या घटनेनंतर तडकाफडकी निर्णय घेऊन भाडे तत्वावर बस गाड्यांचा पुरवठा करणाऱ्या मातेश्वरी या कंपनीच्या मजास, धारावी, प्रतिक्षा नगर व सांताक्रूझ या चार बस आगरातून ३६ मार्गावर हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ४१२ बस गाड्यांची सेवा बेस्ट उपक्रमाने तात्काळ रद्द केली.

बेस्टला भाडे तत्वावर बस गाड्यांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने आणि बस निर्मात्याने आवश्यक बदल तसेच योग्य उपाययोजना करेपर्यंत आणि भविष्यात अशा घटना न होण्याची खबरदारी घेईपर्यंत बेस्ट उपक्रमाने या सर्व ४१२ बसगाड्या प्रवर्तित न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच, बेस्टच्या प्रवाशांना यामुळे थोडी गैरसोय झाली तरी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहे. बेस्ट सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. मात्र बस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये काही बदल करावे लागतील, असे बेस्ट प्रशासनाने अगोदरच म्हटले आहे.