मुख्यमंत्रीच चार महिन्यांपासून चालवतायत यात्रा कंपनी, ठाकरे गटाचे जोरदार टीकास्त्र

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः सर्व कामे बाजूला ठेवून आसाममध्ये जातात ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी, तेही सोबत आमदार व त्यांच्या गटाचे लोक घेऊन. महाराष्ट्रात अनेक यात्रा कंपन्या आहेत व त्या अष्टविनायक, ज्योतिर्लिंगाच्या यात्रा करतात, पण स्वतः मुख्यमंत्रीच अशी एक यात्रा कंपनी चार महिन्यांपासून चालवत आहेत हे आक्रीतच नव्हे काय? तीन महिन्यांपूर्वी त्यांनी सुरत, गुवाहाटी व गोवा अशी यात्रा केली व आता ते पुन्हा आसामच्या यात्रेवर गेले, अशी जोरदार टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कुटुंबीय आणि समर्थकांसमवेत गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. राज्यातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, असे साकडे शिंदे यांनी देवीला घातले. त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने ‘सामना’ दैनिकातील अ्ग्रलेखातून टीका केली आहे.

मुंबईतून विमाने भरभरून माणसे नेली व तेथे नवस फेडले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ‘कामाख्या’ देवीचे दर्शन घेतले, पण दुसऱ्या दिवशी परत मुंबईकडे येताना त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव आणि चिंता स्पष्ट दिसत होती. कामाख्या देवीचे मंदिर देशातील 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. ज्यांना तंत्र, मंत्र किंवा जादूटोणा विषयात रस आहे, असे भक्त येथे येतात व अनेक विधी करतात अशी आख्यायिका आहे. कामाख्या मंदिरास ‘तंत्र-मांत्रिकां’चे प्रमुख सिद्धपीठ मानले जाते, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

खोके सरकार व आता रेडय़ांचे सरकार म्हणून आपण मशहूर झाला आहात, हा देवीचाच कोप म्हणायला हवा. महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहे. तेव्हा हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक मुख्यमंत्री ‘मिंधे’ यांनी केले. आसामात महाराष्ट्र भवन व महाराष्ट्रात आसाम भवन निर्माण करण्याबाबत ते बोलले. एकंदरीत पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यानंतर त्यांना त्यांच्या शिल्लक गटासह आसामातच राहावे लागेल. त्याची सोय ते जाता जाता करीत असावेत, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.