घरदेश-विदेशअखेर करोनावर औषध सापडले?

अखेर करोनावर औषध सापडले?

Subscribe

- अमेरिकन संशोधकांनी केला दावा

जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याने जगभरात २ लाख २७ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. करोना विषाणूवर परिणामकारक ठरणार्‍या लसीचा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरातील ८० वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सुरू असतानाच अमेरिकेमधून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. येथील संशोधकांनी रेमडेसिवीर (Remdesivir) हे औषध शोधले आहे, हे औषध करोनावर परिणामकारक ठरत असल्याचा दावा केला आहे. करोनावर मात करणारे औषध सापडल्याचा दावा करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार असणार्‍या डॉक्टर अँथोनी फॉउसी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रेमडेसिवीर औषधांचा वापर करण्यात आलेल्या करोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे, असे फॉउसी यांनी स्पष्ट केले आहे. रेमडेसिवीर देण्यात आलेल्या रुग्णांनी करोनावर ३० टक्के वेगाने मात केल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी अ‍ॅण्ड इफेक्शियस डिसीजने (एनआयएआयडी) रेमडेसिवीर औषध दिलेले रुग्ण हे इतर औषध देण्यात आलेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक वेगाने करोनावर मात करू शकले असे म्हटले आहे. रेमडेसिवीर देण्यात आलेले रुग्ण ११ दिवसांमध्ये तर इतर औषधांवर असणारे रुग्ण १५ दिवसांमध्ये करोनामधून बरे झाल्याचे निरीक्षक नोंदवण्यात आले आहे. पूर्ण १०० टक्के परिणाम दिसून आला नसला तरी हे यशच आहे. कारण या प्रयोगांमधून औषधांमुळे या विषाणूचा प्रसार थांबवता येईल हे सिद्ध झाले आहे, असे मत फॉउसी यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

- Advertisement -

२१ फेब्रुवारीपासून अमेरिका, युरोप आणि आशियातील एकूण ६८ ठिकाणी या औषधाची चाचणी एक हजार ६३ रुग्णांवर सुरू होती. अनेक दिवसांच्या चाचणीनंतर हे औषध इतर औषधांच्या तुलनेत करोनावर अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे. इबोलाची साथ पसरली होती त्यावेळी रेमडेसिवीरची चाचणी घेण्यात आली होती. मात्र त्यावर हे औषध प्रभावी ठरले नव्हते. आतापर्यंत वापरण्यात येणारी औषधे ही प्रतिकारात्मक असली तरी रेमडेसिवीर हे थेट विषाणूंवर हल्ला करणार्‍या प्रकारातील औषध आहे. हे औषध विषाणूच्या आरएनए आणि डीएनएवर परिणाम करते. हे औषध आरएनए आणि डीएनएमध्ये शोषले जाते आणि ते विषाणूच्या जिनोममध्ये मिसळते. त्यामुळे विषाणूचा गुणाकार होत नाही.

रेमडेसिवीरप्रमाणे काम करणारी औषधांच्या निर्मितीसंबंधात संशोधन करणे गरजेचे असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. रेमडेसिवीर परिणामकारक ठरत असल्याबद्दल संशोधकांनी समाधान व्यक्त केले असले तरी ते वापरण्यासंदर्भात अधिक माहिती गोळा करण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे. या औषधासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र या औषधाच्या आणखीन काही चाचण्या घेतल्या जाण्याची शक्यता आहे. अशा संदर्भातील प्रयोग चीनमध्येही झाला होता. मात्र त्यामधून सकारात्मक परिणाम मिळालेले नव्हते. म्हणूनच या औषधासंदर्भात अधिक संशोधन आणि माहिती घेण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

मात्र जगभरातील ३२ लाखांहून अधिक नागरिकांना करोनाचा संसर्ग झालेला असतानाच रेमडेसिवीरसंदर्भातील बातमी ही आशादायक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या अमेरिकेमध्ये १० लाखांहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळेच करोनावर तातडीने औषध शोधण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. रेमडेसिवीरसंदर्भात अमेरिका लवकरच ठोस निर्णय घेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -