घरमहाराष्ट्रमहाआघाडीसाठी मनसेची चाचपणी सुरू

महाआघाडीसाठी मनसेची चाचपणी सुरू

Subscribe

स्थानिक पदाधिकार्‍यांना मात्र विरोधाची मात्रा

शिवसेना – भाजप यांच्यात अखेर दिलजमाई झाल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष मनसेच्या भूमिकेकडे लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाआघाडीत सामील होणार की नाही याबाबतच्या चर्चेला उधाण आले असून, मनसेनेदेखील आता यासाठी चाचपणी सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात मनसे नेत्यांची विशेष बैठक नुकतीच पार पडल्यानंतर आता मनसेच्या विविध सेलचीदेखील विशेष बैठक पार पडल्याची माहिती हाती आली आहे. या बैठकीच्या माध्यमातून पक्षाकडून महाआघाडीत सामील होण्यासंदर्भातील चाचपणी केली जात आहे. मुख्य म्हणजे, मनसेच्या या प्रयोगाला स्थानिक पदाधिकार्‍यांकडून विरोधाचा खोडा मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाला शह देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने महाआघाडीची मूठ बांधली आहे. ही महाआघाडी करताना विरोधकांना एकत्र आणण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकच लगीनघाई सुरू केली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीकेची झोड उठविली होती. त्यामुळे मनसेला महाआघडीत सामील करून घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू झाले होते. ज्यात विशेषकरून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी यासंदर्भात विरोध केला होता. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्यासाठी थेट राज ठाकरे यांची भेट घेत या मुद्यावर चर्चाही केली. त्यावेळी त्यांना मनसेसाठी काही जागा सोडण्याची तयारीदेखील दाखविली. या बैठकीनंतर कुष्णकुंज येथे काही दिवसांपूर्वीच मनसेच्या नेते मंडळींची विशेष बैठकदेखील पार पडली होती. त्यानंतर आता मनसेच्या बड्या नेत्यांकडून मनसेच्या विविध सेलच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये सध्या महाआघाडीत सामील व्हायचे की नाही. याबाबत विचार जाणून घेतले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणी मनसेच्या काही स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला असता अनेकांनी महाआघाडीत सामील होण्यास विरोध दर्शविला आहे. दोन्ही पक्षांच्या धोरणांत बराच फरक आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही अनेक समस्या समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पक्षांनी अद्याप आमची मते जाणून घेतलेली नाहीत. जर वेळ पडल्यास आम्ही आमचे मत नक्कीच पक्षाला कळवू, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -