घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या 'नंदनवनात' घडला किस्सा 'मंगल जोड्यां'चा

मुख्यमंत्र्यांच्या ‘नंदनवनात’ घडला किस्सा ‘मंगल जोड्यां’चा

Subscribe

आमदार अब्दुल सत्तार काही वेळानंतर निघाले. बाहेर असलेले बुट आपले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपले बुट कोणीतरी दुसराच घालून गेला असल्याचे लक्षात येताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना दमात घेतले

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्ये चपलांचा देखील उल्लेख झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यामध्ये चपलेवरून वाकयुद्ध झालं होते. खडसे मंदिरात देवाच्या दर्शनाला गेले तर, तिथे प्रसाद संपला आणि मंदिराबाहेर आले तर चप्पलच चोरीला गेली, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंची पक्षबदलावर खिल्ली उडवली होती. परंतु हे सांगण्याचे कारण असे की, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल ‘नंदनवन’ बंगल्याबाहेर असाच एक किस्सा ‘मंगल जोड्या’चा घडला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन निवासस्थानी शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांच्या, आमदार आणि खासदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. बंगल्याबाहेर आणि बंगल्यात सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत कायम प्रचंड गर्दी असते. यामध्ये शिवसैनिक, लोकप्रतिनिधी तसेच काही शासकीय अधिकारी देखील हातात फुलांचे गुच्छ घेऊन येत असतात. आपापल्या सोयीने मुख्यमंत्र्यांसोबत फोटो आणि सेल्फीसाठी प्रचंड रेटारेटी होत असते. पण बंगल्यात जाण्यापूर्वी चप्पल, बुट बाहेर काढले जातात. नेते मंडळीसुद्धा चप्पल काढूनच बंगल्यात प्रवेश करतात. मात्र सारख्याच चप्पल असणाऱ्यांचा मात्र गोंधळ उडतो. नेमकी आपली चप्पल कोणती, हे ओळखण्याची परीक्षा ज्याला-त्याला द्यावी लागते. असाच काहीसा प्रकार शिंदे गटाचे आमदार व भाजपा आमदार यांच्यासोबत घडला आहे. दोन आमदारांच्या बुटांमध्ये अदला-बदल झाली. यानंतर एका आमदाराने ते बुट दुसऱ्या आमदाराने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचवले.

- Advertisement -

ज्या दोन आमदारांचा किस्सा आहे, त्यातील एक आमदार हे मुंबईतील अब्जाधीश बिल्डर आणि मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आहेत. तर, दुसरे शिंदे गटातील सिल्लोड, औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार आहेत. दोन्ही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी नंदनवन बंगल्यावर दाखल झाले होते. नेहमीप्रमाणे तिथे प्रचंड गर्दी होती. दोन्ही आमदारांनी अँटी चेंबरमध्ये जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. भेट झाल्यावर सर्वप्रथम मंगलप्रभात लोढा बाहेर पडले. बाहेर दोन्ही आमदारांचे बुट योगायोगाने सारखेच होते. मंगलप्रभात लोढा यांनी त्यातला एक जोड पायात घातला आणि पक्षाच्या पुढील कामासाठी रवाना झाले.

आमदार अब्दुल सत्तार काही वेळानंतर निघाले. बाहेर असलेले बुट आपले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपले बुट कोणीतरी दुसराच घालून गेला असल्याचे लक्षात येताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना दमात घेतले. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, मंगलप्रभात लोढा यांचेसुद्धा बुट सारखेच होते. तेव्हा सत्तार यांनी थेट आमदार मंगलप्रभात लोढा यांना फोन लावण्याचे फर्मान टेलिफोन ऑपरेटरला सोडले. लोढा यांनी फोन उचलला आणि नेहमीप्रमाणे नम्रपणे संवाद साधला. तर दुसऱ्या बाजूला सत्तार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत खणखणीत आवाजात विचारले, ‘माझे बुट तुम्ही घालून गेला आहात का?’. यावर लोढा आपल्या नम्र शैलीत म्हणाले, ‘खरचं का? …हो वाटतं तुमचेच बुट चुकून घातले आहेत. असं करा तुमचा पत्ता द्या, मी हे बुट तिथे पोहोचवतो.’ यानंतर लोढा यांनी लगेच ते बुट अब्दुल सत्तार यांनी सांगितलेल्या पत्त्यावर पाठवून दिले.

- Advertisement -

आताच्या विधानसभेत सर्वाधिक ज्येष्ठ आमदार अशी ओळख असलेले मंगलप्रभात लोढा तर, अडीच वर्षांपूर्वी तिकीट न मिळाल्याने काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार आहेत. तोंडाने काहीसे फटकळ असलेल्या अब्दुल सत्तार यांना मनाने, राजकारणाने आणि श्रीमंतीची ‘उंची’ राखणाऱ्या लोढा यांनी आपल्या नम्रपणाची झलक दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर चर्चा रंगली ती लोढा यांच्या नम्रपणाचीच.


हेही वाचा : आम्हाला श्रेयवादात पडायचं नाही, सर्वांच्या मेहनतीने ओबीसी आरक्षण मिळालं- एकनाथ शिंदे

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -