घरमहाराष्ट्रहीच ती वेळ

हीच ती वेळ

Subscribe

आदित्य ठाकरे,यांचे कौतुकरोहित पवारयांचे अभिनंदन,शिवसेनेच्या आमदारांना हवाय मातोश्रीचा मुख्यमंत्री,विजयी आमदारांची आज पक्षप्रमुखांसोबत बैठक

राज्यात विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला मतदारांनी स्पष्ट बहुमत न दिल्याने आणि सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या आमदारांच्या संख्येतही २४ ने घट झाल्याने विधान भवनावर ऐन दिवाळीत तोरण कोण बांधणार, यासाठी पडद्याआडून सूत्र हलत आहेत. याचाच भाग शिवसेनेने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवताना हीच ती वेळ… नावाची कॅचलाईन बनवली होती. तीच कॅचलाईन पुढे नेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विजय आमदारांनी दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची हीच ती वेळ असून आमदारांची तातडीची बैठक आज मातोश्रीवर बोलवली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आणलेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे, असा मतप्रवाह शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांत आहे. राजकारणात कुणी कोणाचा शत्रू नसतो यानुसार राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन सरकार बनवल्यास काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल या मतापर्यंत हायकमांड विचार करत असल्याचे समजते. त्यामुळे अभी नही तो कभी नही यानुसार शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची आयती संधी गमावू नये आणि भाजपबरोबर फरफटत जाऊ नये, असे निवडणुकीत पराभव झालेल्या एका राज्यमंत्र्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

१४ व्या विधानसभेच्या गुरुवारी पार पडलेल्या मतमोजणीनंतर युतीचे सत्ता संपादन भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या समक्ष झालेल्या फॉर्म्युल्यामुळे त्रिशंकू बनले आहे. त्यामुळे पूर्णपणे सत्तेचा लाभ घेण्याची हीच वेळ असल्याचा संदेश शिवसेनेत पसरू लागला आहे. जाहीर झालेल्या निकालात भाजपची पुरती कोंडी झाली असताना सत्तेचा हा वारू युतीसाठी दिलेल्या फॉर्म्युल्यानेच पार होईल, अशी ठाम भूमिका सेनेने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि पवार कुटुंबियांचे नातेसंबंध आणि जिव्हाळा या निमित्त पुन्हा एकदा समोर आला आहे. ठाकरे घराण्याचा निवडणुकीत विजयी झालेला पहिला वारस आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आदित्य ठाकरे यांचे स्वत: शरद शरद पवार यांनी निवडणुकीतील यशाबाबत कौतुक करत अभिनंदन केले. तसेच कर्जत जामखेडमधून भरघोस मते घेऊन विजयी झालेले पवारांचे नातू रोहित पवार यांचे फोन करून ‘मातोश्री’ने अभिनंदन केले. कौटुंबिक नात्याचे हे समीकरण आगामी सत्ता स्थापनेत उतरू शकते असे जाणकार सांगत आहेत.

राज्य विधानसभेच्या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालाने भारतीय जनता पक्षाला जमिनीवर आणले आहे. १४० जागा जिंकण्याची अपेक्षा ठेवलेल्या भाजपला १०५ जागांमध्ये समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेनेला 56 आमदारांवरती थांबावे लागले. या पार्श्वभूमीवर सत्तेत समान वाटपाच्या फॉर्म्युल्याशिवाय सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, अशी ठोस भूमिका उध्दव ठाकरे यांनी जाहीररित्या घेतली आहे. ही भूमिका प्रत्यक्ष कृतीत आणण्यात भाजपकडून सहकार्य किती मिळते यावर सत्तेची सारी गणिते रचली जात आहे.

- Advertisement -

मात्र या घडीला भाजप फॉर्म्युल्यानुसार वागेल यावर सेनेचा विश्वास नाही. मंत्रिपदे मिळतील पण अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद मात्र भाजप देणार नाही, असे चित्र आहे. भाजप शब्दाला जागणार नसेल तर काय करायचे यासंबंधीचे धोरण ठरवण्यासाठी सेनेच्या आमदारांना ‘मातोश्री’वर उपस्थित राहण्याचे निरोप रवाना झाले आहेत. आपल्या शिरस्त्याप्रमाणे भाजपने सत्तेत समान वाटा देण्यास नकार दिल्यास विरोधी पक्षांची म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन करण्याचा पर्याय सेनेपुढे खुला आहे. विरोधकांच्या मदतीने मुख्यमंत्रीपद घ्यायचे की भाजपच्या तुकड्यावर जगायचे असा थेट प्रश्न सैनिक विचारत आहेत.

दुसरीकडे विरोधी पक्षात काम करण्याची जबाबदारी आपल्याकडे आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले असले तरी पवार आणि ठाकरे कुटुंबीयांचे कौटुंबिक नातेसंबंध लक्षात घेता पवार आपल्या विरोधी पक्ष या भूमिकेवर फारकत घेऊ शकतात, असे वातावरण तयार होऊ लागले आहे. सेनेचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले अदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विजय होताच शरद पवार यांनी त्यांना फोन करून कौतुक आणि अभिनंदन केले.

आदित्यप्रमाणेच पवारांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघात कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा पराभव करणार्‍या रोहित पवार यांचा अभिनंदन ‘मातोश्री’तून करण्यात आले. सत्ता समन्वयाची ही पार्श्वभूमी बोलकी असल्याने आणि भाजपकडून सातत्याने होणारा अवमान लक्षात घेता सेनेच्या आमदारांनाही सत्तेत पूर्णपणे वाटा मिळणार नसल्यास पर्यायाचा अवलंब करण्याकडे कल स्पष्ट दिसू लागला आहे. यात काँग्रेस पक्षाचाही आता अडसर राहिलेला नाही. पक्ष प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी सत्तेसाठी सेनेला पाठिंबा देण्याचे सुतोवाच पहिल्याच दिवशी केले. पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही प्रस्ताव आल्यास विचार करण्याचे म्हटले आहे. हा सारा तपशील लक्षात घेता ‘हीच ती वेळ, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्याची’ ही टॅगलाईन सेनेचे आमदार वापरू लागले आहेत.

शिवसेना अब तक ५९
शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले असून तीन अपक्ष आमदारांनी शिवसेनला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ ५९ झाले आहे. आशिष जयस्वाल (रामटेक), नरेंद्र भोंडेकर (भंडारा) आणि चंद्रकांत पाटील (मुक्ताई नगर) या अपक्षांनी शिवसेनबरोबर असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.

काँग्रेस पक्षाची विचारसरणी वेगळी असूनही भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर सेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका आमचा पक्ष घेऊ शकतो, ती काळाची गरज आहे.
-हुसेन दलवाई, काँग्रेस प्रवक्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -