घरमहाराष्ट्रबोगस डॉक्टर देतोय करोनाचा सामना करण्याचे सल्ले

बोगस डॉक्टर देतोय करोनाचा सामना करण्याचे सल्ले

Subscribe

व्याख्यानांच्या माध्यमातून करतोय प्रसार

करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे सारेच चिंतेत असताना राज्यातील बोगस डॉक्टरने मात्र आपला धंदा जोरात चालवण्याची आयतीच संधी हेरली आहे. बोगस डॉक्टर म्हणून कारवाई झालेल्या कोल्हापुरातील स्वागत तोडणकरने आपल्या व्याख्यानातून करोनापासून वाचण्याचे सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. तसेच आपण सांगितलेला उपाय केल्यास तुम्हाला करोना होणार नाही, असा छातीठोक दावाही त्याच्याकडून करण्यात येत आहे.

करोनापासून बचाव करण्यासाठी राज्य सरकारने शाळा, कॉलेज यांना सुट्टी देण्याबरोबरच खासगी कंपन्यांनाही वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. करोनाचा सामना करण्यासाठी सरकार अतोनात प्रयत्न करत असताना राज्यातील बोगस डॉक्टर म्हणून अटक झालेल्या व तीन ठिकाणी गुन्हे दाखल असलेल्या स्वागत तोडकरने आपला धंदा तेजीत चालवण्याची संधीच हेरली आहे. स्वागत तोडकर हा राज्याच्या विविध भागांमध्ये आरोग्य विषयक व्याख्याने देत असतो. त्यांच्या या व्याख्यानांचे व्हिडीओ ‘मराठी डॉक्टर’ या युट्युब चॅनेलवरही प्रसारित करण्यात येतात.

- Advertisement -

14 फेब्रुवारीला झालेल्या एका व्याख्यानाचा व्हिडिओ तोडकरने युट्युब चॅनेलवर प्रसारित केला आहे. यामध्ये त्याने ‘आता नवीन एक आजार आला आहे, सर्व त्याला घाबरून आहेत. कितीही काहीही असू द्या तुम्हाला काहीही होणार नाही. चॅलेंज देतो मी, पण मी सांगतो ती एकच गोष्ट करायची वेखंडाची पावडर तयार करून छातीला, पाठीला, नाकाला व डोक्याला लावून झोपायचे, हा उपचार सात दिवस करायचा तुम्हाला करोनाची लागण होणार नाही. तसेच त्याचा काढा करून अर्धा चमचा प्यायलात तरी छातीतील कफ निघून जातो.’ असा उपचार सांगत त्याने लोकांची दिशाभूल केली आहे.

कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तोडकर ‘आजीबाईच्या बटव्या’तील औषधे निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून नागरिकांना सांगतो. स्वतः च्या नावासमोर डॉक्टर ही पदवी लावत त्याने आपली दुकानदारी सुरू केली आहे. आरोग्यविषयक घरगुती उपचार या विषयावरील व्याख्याने राज्यभर देऊन त्याचे व्हिडिओ यू ट्यूबवर टाकून त्याने आपला व्यवसाय वाढवला आहे. तोडकर विरोधात महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने मार्च २०१७ मध्ये कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे, पुणे, संगमनेर येथे त्याच्यावर बोगस डॉक्टर म्हणून गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

कोल्हापूरपाठोपाठ त्याने पुणे, संगमनेर येथे संजीवनी निसर्ग आधार केंद्रे सुरु केली आहेत. त्याच्यावर फौजदारी कारवाई होऊनही आरोग्य विभागाकडून डोळेझाक करण्यात येत आहे. परंत, आता करोनासारख्या गंभीर रोगाबाबतही तोडकरने आपल्याकडे उपचार असल्याचा सर्रास प्रचार करण्यास सुरुवात करत त्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे.

वैद्यकीय शिक्षण नसलेली व्यक्ती वेखंडाचा छातीला लेप लावा, तुम्हाला करोना होणारच नाही असे ओपन चॅलेंज तो देतो, हे आश्चर्यकारक आहे. स्वागत तोडकरला बनावट वैद्यकीय व्यवसाय केल्याबद्दल महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या तक्रारीवरुन अटक होऊन त्यावर गुन्हाही नोंदवला आहे. राज्यामध्ये संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना अशा प्रकारे आयुर्वेदाच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करणारे वक्तव्य करणे निंदनीय आहे. शासनाने तत्काळ या प्रकाराची दखल घेऊन अशा बेजबाबदार व्यक्तींवर कडक कायदेशीर कार्यवाही करावी.
– डॉ. आशुतोष गुप्ता, अध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, मुंबई.

तोडकर याने फेब्रुवारीमध्ये करोना संदर्भात केलेल्या व्याख्यानाचा व्हिडिओ आम्ही पाहिला आहे. त्यानुसार आम्ही पोलिसांच्या सायबर सेलला पत्र लिहिले आहे. पोलिसांकडून यावर आता कारवाई करण्यात येईल.
– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -