घरमहाराष्ट्रमुसळधार पावसाने पालघरला झोडपले

मुसळधार पावसाने पालघरला झोडपले

Subscribe

धामणी, कवडास धरणांतून पाणी सोडल्याने नदी, नाल्यांना पूर

शुक्रवार रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाने पालघर जिल्ह्याला झोपडून काढले. त्यातच धामणी आणि कवडास धरणाचे दरवाजे उघडले गेल्याने जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे अनेक लहान-मोठे पूल, मोर्‍या पाण्याखाली गेल्या होत्या. कित्येक गावाचा संपर्क तुटला होता. तर किनारपट्टीवरील काही गावांमध्येही समुद्राचे पाणी शिरले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 3 आणि 4 ऑगस्ट 2019 रोजी पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 157 मिमी पाऊस झाला आहे. धरणांच्या आणि नद्यांच्या पातळीत देखील वाढ होत असल्याने दुपारी 1 वाजल्यापासून धामणी आणि कवडास या धरणांमधून 42,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मोठ्या भरतीची शक्यता पाहता किनारपट्टीच्या रहिवाशांना देखील सतर्क करण्यात आले आहे.

धरणातून पाणी सोडल्याने अनेक नद्या,नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर कित्येक ठिकाणचे पूल, रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.

- Advertisement -

डहाणू,चारोटी ,वाणगाव ,खडखड,देदाळे बोर्डी येथे मुख्य रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अतिवृष्टीमुळे नागझरी आणि तलासरी विकासपाडा येथे दोन ठिकाणी घरे कोसळल्याच्या घटना घडल्या. डहाणू शहर ,वाणगाव,चिंचणी, बोर्डी येथे बारा जणांच्या घरात काल पाणी शिरल्याने त्या घरांच्या पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. डहाणूच्या ग्रामीण भागातील नद्या ओहोळ दुथडी वाहू लागले. तर ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन प्रमुख राज्यमार्गावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. चारोटी येथील गुलजारी नदीला पूर आल्याने सकाळी आणि दुपारच्या सुमारास पूल पाण्याखाली गेला होता. खूटखाडी पूल , कोलपाडा येथे पूल पाण्याखाली गेल्याने डहाणू बोर्डी वाहतूक ठप्प झाली. तर कासा येथे सुर्या नदीवरील जूना पूल पाण्याखाली गेला.

वाणगाव येथे देदाळे तसेच खडखड येथे पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे सकाळी वाहतुक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत बनले. कंक्राटी नदीला पूर आल्याने मसोली परिसरात पाणी शिरले. पुरामूळे डहाणू शहरातील ईराणीरोडवर पाणी चढले होते. तर जलाराम परिसर जलमय झाला होता. मसोली परिसरात तसेच बाजारपेठेत काही दुकानात पाणी शिरुन नुकसान झाले. सावटा येथे घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर कंक्राटी नदीवरीच्या पूरामध्ये कंक्राटी पुलावरील लोखंडी कठडे तुटले आहेत. चिखले पोलीस चौकीत पाणी शिरले होते. सतीपाडा, प्रभूपाडा ,मसोली, सरावली येथील काही घरांमध्ये पाणी गेले होते. तानसा नदीला पूर आल्याने वसईच्या पूर्वेकडील ग्रामीण भागातील अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. यावेळी पांढरतारा पूल पुन्हा पाण्याखाली गेला.

- Advertisement -

वाढवण समुद्राच्या खडकावर मालवाहतूक बोट
मुंबई बंदरात स्टील कॉईल खाली करुन सुरतला परतत असताना शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास ‘नंद अपर्णा’ या मुंबईच्या मालवाहू बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने डहाणूच्या वाढवण किनार्‍यावर लागली. 100 फूट पेक्षा जास्त लांब आणि 30 ते 40 फूट उंच बोट लागल्याने परिसरात खळबळ माजल्याने किनार्‍यावर बघ्यांनी गर्दी केली होती. बोट खडकावर आपटल्याने बोटीचे मागच्या 2 सुकाणूपैकी 1 सुकाणू तुटले. या रिकाम्या मालवाहू बोटीमध्ये 10 ते 12 खलाशी होते. ते सर्वजण सुरक्षित आहेत.

शेतकर्‍याचा नदीत बुडून मृत्यू
वसई , जव्हार तालुक्यातील आदखडक गावातील रवींद्र काशिनाथ रावते (35) हा शेतकरी नदीच्या पूरात वाहून गेल्याने मृत्यू पावला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. रवींद्र आपली पत्नी संगीता सोबत शेतात गेला होता. दुपारी जोरदार पाऊस सुुरु झाल्याने शेतातील कामे उरकून संगीता एकटीच घरी परतली. प्रचंड पाऊस पडत असल्याने आदखडक आणि काकुडे गावाच्या दरम्यान असलेल्या नदीच्या छोटा पूल पाण्याखाली जाऊन त्यावरून पाणी जात होते. या पाण्यातून रवींद्र पलिकडे जात असताना प्रचंड लोंढ्याने तो वाहून गेला. दुसर्‍या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला.

दहावीचा विद्यार्थी पुरात बेपत्ता

वसई, विक्रमगड तालुक्यातील खुदेड कुंडापाडा येथील दहावीचा विद्यार्थी शाळेतून घरी परतत असताना पुरात वाहून बेपत्ता झाला. सीताराम शिवराम चौधरी असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. सीताराम साखरा येथील छत्रपती हायस्कूलचा विद्यार्थी होता. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास शाळेतून घरी येत होता. तिवसपाडा नदी पुलावरून तो जास्त होता. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता. त्यात तो वाहून गेला. त्याची शाळेची बॅग नदी किनारी सापडल्यानंतर सीताराम वाहून गेल्याचे उजेडात आले. शनिवारी संध्याकाळपर्यंत शोध मोहीम सुरू होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -