Lockdown : आजपासून ठाण्यात खासगी वाहनांना वाहतूकीस बंदी लागू  

अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळता दुचाकी, चारचाकी, रिक्षा आणि सर्वप्रकारच्या टॅक्सी यांची वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवार संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळता दुचाकी, चारचाकी, रिक्षा आणि सर्वप्रकारच्या टॅक्सी यांची वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हे आदेश दिले आहेत.
 
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तरीसुध्दा नागरिकांची  बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. तसेच काही नागरिक वाहनांमधून फिरत असल्याचे दृष्टीस पडत आहेत. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात कोरानोग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी वाहनाच्या वाहतूकीस बंदी घातली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मोडणारे दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे शहरात कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर गल्लोगल्ली या ठिकाणी सर्व प्रकारची दुचाकी तीन चाकी रिक्षा हलकी चारचाकी वाहने तसेच सर्वप्रकारच्या टॅक्सी यांना प्रवासी वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.