कोरोना व्हायरस : ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा रद्द होण्याच्या मार्गावर

ट्वेन्टी - २० विश्वचषकासाठी महत्त्वाची समजली जाणारी आशिया चषक स्पर्धा ही रद्द होण्याच्या मार्गावर आहे, असे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले.

कोरोनाचा जबरदस्त फटका संपूर्ण जगाला बसला आहे. आता याचा फटका क्रिकेट क्षेत्राला ही बसू लागला आहे. ट्वेन्टी – २० विश्वचषकासाठी महत्त्वाची समजली जाणारी आशिया चषक स्पर्धा ही रद्द होण्याच्या मार्गावर आहे, असे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले. आशिया चषक स्पर्धा ही पाकिस्तानमध्ये होणार होती. पण भारताच्या विरोधामुळे ही स्पर्धा दुबईत घेण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता ही स्पर्धा रद्द होण्याच्या मार्गावर आली आहे.

भारतातील आयपीएल स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच ऑलम्पिक स्पर्धा ही रद्द करण्यात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता आशिया चषकावरही संकट ओढवले आहे. सध्याच्या स्थितीला कोणत्याच गोष्टीचा अंदाज घेता येत नाही. परंतु प्रत्येकाला सतर्कतेचा उपाय हा अंमलात आणला पाहिजे. पण सध्याचे वातावरण पाहता आशिया चषक वेळेनुसार पार पडेल असे काही दिसत नाही. कारण जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या घडीला आशिया चषक स्पर्धेबाबत भाष्य करणे योग्य ठरणार नाही. कारण अजून कोणतीही बैठक झालेली नाही. जेव्हा बैठक होईल त्यांनतरच योग्य भाष्य करता येईल.

ट्वेन्टी-२० चषकाचा चांगला सराव व्हावा, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाचा दौरा करण्याचे ठरविले होते. ऑस्ट्रेलियाने सहा महिने आपल्या सीमा बंद करण्याचे ठरविल्याने हा दौरा रद्द होण्याच्या मार्गावर आहे.