उदय सामंत नॉट रिचेबल, राजकीय गोटात चर्चांना उधाण

Uday Samant

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोर केल्यानंतर महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनेचे जवळपास ४० हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये आहेत. आमदारांच्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. परंतु सर्वात धक्कादायक म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे उदय सामंत देखील शिंदे गटात सामील झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच ते सुरतहून विशेष विमानाने गुहवाटीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

काल राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीमध्ये उदय सामंत हे उपस्थित होते. मात्र, आज सकाळपासून उदय सामंत हे देखील नॉट रिचेबल असल्यामुळे ते देखील शिंदे गटात सामील झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचे निकटवर्तीय आणि येथील कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाहीये. परंतु ते चार्टड प्लेनने रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे.

ज्या चार्टड प्लेनमधून आमदारांचं येणं-जाणं झालेलं आहे. त्याचाच एक चार्ट समोर आला असून उदय सामंत यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ते गुवाहाटीला रवाना झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे. ज्यावेळी उदय सामंत हे त्यांच्या निवासस्थानी पाली येथे गेले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, आतापर्यंत पक्षाने मला खूप काही दिलेलं आहे. मला जबाबदारी दिली असून मी आमदार झालो आहे. त्यामुळे मी या लोकांसोबत का जाईन. जर काही गैरसमज असतील तर ते दूर केले पाहीजेत. अशा मताचा मी आहे, असं उदय सामंत यांचं मत होतं. परंतु आता दोन दिवसांनंतर ते नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे सामंत गुवाहाटीला पोहोचणार असल्याचं सांगितलं जात आहे.

याआधी कोकणताले दोन आमदार गुवाहाटीला रवाना झाले होते. आमदार योगेश कदम आणि खासदार दीपक केसरकर हे दोघे गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर आता उदय सामंत हे अचानक नॉट रिचेबल झालेले आहेत. तर विधानसभेतले आता एकमेव मंत्री आदित्य ठाकरे उरले आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आज युवासेनेने तातडीची कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. आज, रविवारी सायंकाळी सहा वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत बंडखोर आमदारांचे पुत्र हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : एकनाथ शिंदेगटाची गोची , कायद्याची गुंतागुंत, विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही