घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरेसाहेब मुख्यमंत्री या नात्याने निर्णय घेतील

आदित्य ठाकरेसाहेब मुख्यमंत्री या नात्याने निर्णय घेतील

Subscribe

अजित पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

महाराष्ट्रातील नागरिकांच्या जिवाशी खेळून चालणार नाही. आरोग्य चांगले ठेवावे लागेल. त्याठिकाणी रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी केलेली आहे. बाकी सगळे सुरू ठेवले आहे. परंतु नियमांचे पालन करून सुरू ठेवलेले आहे. तशाच पद्धतीने पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे; पण जर ऑक्सिजनची मागणी फार मोठ्या प्रमाणावर वाढली तर याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरेसाहेब घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यातील जिल्हा बँक निवडणुकीतील विजयीनंतर बोर्ड मिटिंगला अजित पवार शनिवारी पुण्यात आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मी नियमाचे काटेकोर पालन करणारा आहे. गर्दी होऊ नये म्हणून काही काही ठिकाणी माझे 10 वाजताचे कार्यक्रम 7 वाजता उरकले, बाकीचे सगळे कार्यक्रम रद्द केले. आज बैठकीला नसतो आलो तर ब्रेकिंग न्यूज चालली असती. अजित पवार अजूनही नाराज, पुणे जिल्हा मध्यवर्ती बोर्ड मीटिंगला गैरहजर, असे नाही झाले. पण तुमच्याशी बोलल्यानंतर मी आता जाणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्याप समोर आलेले नाहीत. अधिवेशनातही मुख्यमंत्री येतील, असे वाटत असतानाच त्यांनी तिकडेही उपस्थिती दर्शवली नाही. त्यानंतर विरोधकांपैकी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरेंकडे देण्याचा सल्ला दिला होता. त्यावरूनही बराच गदारोळ झाला होता. परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या विधानाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.

विधान मागे घेतले
अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री संबोधल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. वृत्तवाहिन्यांवर तशा बातम्याही चालवल्या जात होत्या. संध्याकाळी अजित पवार यांनी त्यावर खुलासा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. मी आदित्य हा शब्द मागे घेतो आणि त्याठिकाणी उद्धवजी हा शब्द देतो. असे काहीही नाही. आमचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरेच आहेत, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -