भाजपच्या दबावामुळेच उद्धव ठाकरे यांचा मुर्मूंना पाठिंबा

विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा आरोप

yashwant sinha

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच भाजपप्रणित रालोआच्या राष्ट्रपदीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेकडून पाठिंबा जाहीर केला आहे, परंतु उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय भाजपच्या दबावाखाली येऊन घेतला आहे, असा दावा विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी केला आहे.

गुवाहाटीत प्रसारमाध्यमांशी बोलताना यशवंत सिन्हा यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, केंद्रीय संस्थांचा वापर करूनच विरोधी सरकारला अडचणीत आणायचे प्रयत्न सातत्याने केंद्र सरकारकडून केले जात आहेत. महाराष्ट्रातील सरकार देखील अशाच पद्धतीने पाडण्यात आले. याचप्रकारे राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी देखील केंद्र सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असून केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करत आहेत. उद्धव ठाकरे यांना देखील दबावात घेत भाजपने आपल्या बाजूने निर्णय घेण्यास भाग पाडले आहे.

हा परस्परविरोधी विचारसरणीचा संघर्ष आहे, त्याचाच भाग म्हणून आपण राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास तयार झालो आहे. वैयक्तिकरित्या, द्रौपदी मुर्मू यांचा आदर करतो, पण त्या कोणत्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात ते बघणे देखील महत्त्वाचे आहे. आपल्याला मूक राष्ट्रपती हवे आहेत का? आपण राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर राजकारण्यांविरोधात वापरल्या जाणार्‍या केंद्रीय संस्थांचा गैरवापर थांबेल, असा दावा देखील सिन्हा यांनी केला.

द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपतीपदावर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. त्यांना पाठिंबा देउन आपल्याला आनंदच होईल. शिवसेनेच्या आदिवासी नेत्यांनी, महिला पदाधिकार्‍यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरला होता. हा पाठिंबा मुर्मू यांना आहे भाजपला नाही. तसेच कुणाच्याही दबावाला बळी पडून घेतलेला हा निर्णय नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.