अवकाळीमुळे शेतकऱ्यांची अग्नीपरीक्षा; लासलगावी द्राक्षबागेवर कुऱ्हाड

निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव विंचूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने नैराश्यातून घेतला निर्णय

Grapes cutting

लासलगाव – गेल्या तीन वर्षांपासून सततच्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक प्रचंड आर्थिक संकटात सापडला असताना, आता दोन दिवसांपासून पुन्हा सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या अपेक्षांवरही पाणी फेरलंय. या पावसाने आर्थिक तडाखा दिल्यानं वैफल्यग्रस्त झालेल्या लासलगाव येथील एका शेतकऱ्याने एक एकरातल्या द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवली.

याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव विंचूर येथील शेतकरी रावसाहेब गवळी यांनी आपल्या एक एकर शेतीत द्राक्ष लागवड केली होती. मात्र, गेल्या २४ तासात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाल्याने वैतागून त्यांनी संपूर्ण द्राक्षबाग तोडून टाकली. गेल्या काही वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे हतबल झाले आहेत. द्राक्षबागा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करूनदेखील या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. यामुळे निराश झालेल्या गवळी यांनी संतापातून टोकाचं पाऊल उचललं. यंदाच्द्राया हंगामात दीड लाखांहून अधिक खर्च करूनदेखील संपूर्ण बागेचं या अवकाळीने चार ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी फेरलंय.