घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवेदोक्त आणि पुराणोक्त यामुळे पुन्हा वर्णभेद वाद; संविधान हाती घेउन जितेंद्र आव्हाड...

वेदोक्त आणि पुराणोक्त यामुळे पुन्हा वर्णभेद वाद; संविधान हाती घेउन जितेंद्र आव्हाड काळाराम मंदिरात

Subscribe

नाशिक : संयोगीताराजे यांना काळाराम मंदिरात वेदोक्त पद्धतीने पूजाविधी करण्यास रोखले असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर आ.जितेंद्र आव्हाड यांनी डाव्या हाताला काळी फित बांधून शनिवारी (दि.१) प्रसिद्ध काळाराम मंदिरात येऊन रामाचे दर्शन घेतले. यावेळी तिरंगा झेंडा व भारतीय संविधान हाती घेऊन मंदिरात प्रवेश केला. वेदोक्त पूजाविधी सर्वांना एक सारख्या पध्दतीने लागू केल्यास भविष्यात अशा प्रकारचा वाद पुन्हा निर्माण होणार नसल्याचे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे गत महिन्यात काळाराम मंदिरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संभाजीराजे यांच्या दीर्घायुष्यासाठी पूजा केली. यावेळी त्यांना वेदोक्त पध्दतीने पूजा केली जात नसल्याने त्यांनी आक्षेप घेत पूजा करणार्‍या महंतांना रोखले होते. ही सर्व घटनेची पोस्ट संयोगीताराजे यांनी रामनवमीच्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने राज्यभरात खळबळ उडाली. यानंतर महंत सुधीरदास पुजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन गैरसमजातून हा प्रकार घडला असल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आ.जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी (दि.१) दुपारी काळाराम मंदिरात येऊन रामाचे दर्शन घेतले.

- Advertisement -

यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधी यांच्यासोबत संवाद साधताना सांगितले की, वसूधैव कुटुंबकम मानणारा धर्माभिमानी हिंदू मी आहे. देव ही काही कोणाची मालकी नाहीये. वेदोक्त आणि पुराणोक्त यामुळे पुन्हा वर्णभेद वाद निर्माण होत आहे. छत्रपती घराण्यास आजही अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. शाहू महाराज यांचा अंत्यविधी त्यांनी घडविलेल्या विद्यार्थ्यांनी केला असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. अजून किती दिवस वर्ण व्यवस्थेत समाज राहणार आहे. असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी, ब्रह्मवृंद आणि त्यांचे धर्मपीठ यांनी विचार करून वर्ण व्यवस्था मिटवून सर्व समाज एकसमान मानून त्यांना वेदोक्त पूजाविधी करण्याची मागणी यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली. यावेळी मंदिरात महंत उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते महंत उपस्थित असते तर त्यांच्याकडून आमची बौद्धिक पातळी तापसून घेतली असती. असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे,पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -