घरमहाराष्ट्रऐन श्रावणात शाकाहार महागला !

ऐन श्रावणात शाकाहार महागला !

Subscribe

कडधान्यावर मानावे लागतेय समाधान

मुसळधार पावसामुळे बाजारातून भाजीपाला गायब झाला असून, प्रामुख्याने जेथून तो येतो तेथेही पावसाचे धुमशान सुरू असल्याने सध्या निम्मा भाजीपालाही येथे पोहचत नाही. येणारा मालही दुय्यम दर्जाचा किंवा खराब असल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत. गेला आठवडाभर बाजारात भाजीचे प्रमाण अल्पच असल्यामुळे सुरू असलेल्या श्रावण महिन्यात बहुंताश घरातून शाकाहारींची पंचाईत झाल्याने त्यांना कडधान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

पावसामुळे भाज्यांचे दर गेल्या तीन दिवसांत दुपटीपेक्षा अधिक वाढले आहेत. पुरवठा कमी झाल्यामुळे बाजारात निर्माण झालेल्या भाववाढीचा फटका हॉटेल व्यवसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. हा पाऊस आणखी दोन दिवस सुरू राहिल्यास शाकाहारात डाळ व कडधान्याला पर्याय नसेल, अशी चिन्हे आहेत. स्थानिक भाजीपाल्यासह पुणे, मुंबई येथून मोठ्या प्रमाणात दररोज भाजी शहरात येत असते. तेथून ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेते भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जातात. स्थानिक भाजीपाला बाजारात कमी प्रमाणात येतो. त्यातच बाहेरून येणारी भाजीची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी करणार्‍या हॉटेल, खानावळ, पर्यटन व्यवसायिक, रुग्णालये यांची अडचण झाली आहे. मेथी, कांद्याची पात, पालक, लाल माठ, कोथिंबिर, पुदिना या भाज्या बाजारातून जवळपास गायब झाल्या आहेत.

- Advertisement -

कोथिंबिरची जुडी ३० रुपयांवरून ८० ते १०० रूपये, पावटा १८० ते २०० रुपये प्रती किलो, टोमॅटो २५ वरून ८० ते ९० रुपये, मटार २०० ते २५० रुपये, गवार व वांगी ४० रुपयांवरून ८० ते १०० रुपये प्रती किलो असे दर वाढले आहेत. फ्लॉवर, काकडी, तोंडली, भेंडी, कोबी, फरसबी, कारली या भाज्या गेल्या आठवड्यात ४० ते ५० रुपये प्रती किलो दराने विकल्या जात होत्या तो दर ८० ते १०० रुपयांवर पोहचला आहे.

पाऊस थांबल्यानंतर भाज्यांची आवक वाढली तरच भाव उतरण्याची शक्यता असल्याचे भाजी विक्रेते सांगतात. कांद्याची पात व कोबीचे दर वाढल्यामुळे चायनिज सेंटरवरसुद्धा परिणाम झाला आहे. पर्यटन व्यावसायिकांना शाकाहारी थाळी देणे परवडेनाशी झाली आहे. परंतु आलेल्या पर्यटकांना नाराज करता येत नसल्यमुळे थाळीचे भावही वाढविता येत नसल्याचे या व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

कांदे, बटाटे, लसूण साठवून ठेवता येतात. भोपळा वगळता फळभाज्यांसह पालेभाज्या एक दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवता येत नाहीत. त्यातच मासळीचाही दुष्काळ सुरू असल्याने अनेकांना सक्तीचा शाकाहार घडत असल्याने याचा परिणाम भाज्यांच्या किमत वाढीवर झाला आहे.
-मालतीबाई चोरघे, भाजी विक्रेती, अलिबाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -