घरदेश-विदेशडोवाल मरकजमध्ये काय करत होते?

डोवाल मरकजमध्ये काय करत होते?

Subscribe

मरकजच्या मुद्यावर केंद्र सरकारवर निशाणा

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमात रात्री दोन वाजता सहभागी होऊन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काय करत होते? असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी केला. देशमुख यांनी हा सवाल करून केंद्रीय गृह मंत्रालयावर निशाणा साधला आहे.

अनिल देशमुख यांनी बुधवारी आपल्या लेटरहेडवर तबलिगीच्या कार्यक्रमासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मरकजच्या आयोजनला परवानगी का दिली? हा कार्यक्रम का रोखला नाही? असे सवाल देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रात वसई येथे १५ आणि १६ मार्च २०२० रोजी तबलिगीचा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमात ५० हजार तबलिगी सहभागी होणार होते. मात्र सरकारने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. असे असताना निजामुद्दीन येथे मरकजच्या कार्यक्रमला केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी का दिली? या कार्यक्रमामुळे सर्व राज्यात करोनाचा संसर्ग होऊन प्रादुर्भाव वाढला याला जबाबदार कोण? असा सवाल देशमुख यांनी केला आहे.

मरकजच्या कार्यक्रमात डोवाल यांना का पाठवले? हे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे होते की दिल्ली पोलीस आयुक्तांचे? आता दोघेही मरकजच्या कार्यक्रमावर बोलण्याचे का टाळत आहेत? डोवाल यांना भेटल्यानंतर दुसर्‍या दिवशी मौलानासाहेब कुठे फरार झाले? अशी सरबत्ती अनिल देशमुख यांनी केली आहे.

- Advertisement -

अपयश झाकण्यासाठी टीका
ही वेळ राजकारण करण्याची नाही. तरीही मतांचे राजकारण करण्यासाठी आणि आपले अपयश झाकण्यासाठी अनिल देशमुख हे केंद्रावर टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जे मरकजच्या कार्यक्रमात सहभागी होऊन महाराष्ट्रात आले त्यांना हुडकून काढण्यात सरकारला अजून यश आलेले नाही. हे अपयश लपविण्यासाठी देशमुख यांनी पत्राच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. जे मरकजमध्ये सहभागी झाले होते त्यापैकी अजून ५० ते ५५ लोक सरकारला सापडले नाहीत. हे लोक मानवी बॉम्बसदृश आहेत. त्यांना शोधले नाही तर करोनाचा मोठ्याप्रमाणात संसर्ग वाढेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -