घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी भविष्य बघितल्याची चर्चा असलेले 'कॅप्टन खरात' नेमके कोण ?

मुख्यमंत्र्यांनी भविष्य बघितल्याची चर्चा असलेले ‘कॅप्टन खरात’ नेमके कोण ?

Subscribe

नाशिक : नाशिक-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील बैठका अचानक रद्द करुन बुधवारी (दि. २३) शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला आले; शिवाय त्यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरात शंकराची पूजा केली. महत्वाचे म्हणजे मिरगाव हे ज्योतिषी कॅप्टन खरात यांच्यासाठी प्रसिद्ध असून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून ज्योतिष बघितल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कथित ज्योतिष बघण्याच्या कृतीचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास शिर्डीत पोहोचून सपत्नीक साईबाबांच्या दरबारात हजेरी लावून साईंचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौर्‍यानुसार ते मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र अचानक त्यांचा ताफा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या दिशेने रवाना झाला. अचानक बदललेल्या या दौर्‍यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. मिरगावच्या शिवारात पोहचल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या या मिरगाव दौर्‍याची अत्यंत गोपनियता ठेवण्यात आली होती. मात्र माध्यम प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले. तिथे मुख्यमंत्री प्रसिद्ध ज्योतिषी कॅप्टन खरात यांना भेटले आणि त्यांनी त्यांचं भविष्य जाणून घेतले, अशी चर्चा परिसरात सुरू झाली.

- Advertisement -
कोण आहेत कॅप्टन खरात?

कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात यांना राजकीय गुरुजी म्हणून ओळख आहे. देशभरातील अनेक राजकारणी, त्यांच्याकडे ज्योतिष बघायला येत असतात. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील त्यांच्याकडूनच ज्योतिष बघतात असे बोलले जाते. खरात यांनी अनेक वर्ष भारतीय सैन्यात काढले. त्यानंतर ते ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध झाले. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील त्यांच्या ज्योतिष कार्यालयात सुमारे १८ वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तत्कालीन पदाधिकारी महेंद्र दातरंगे व सुदेश घोडेराव यांनी प्रवेश करुन त्यांच्या ज्योतिष सांगण्यावर आक्षेप नोंदवला होता. सिन्नर तालुक्यातील मिरगाव महादेव मंदिरामुळे जसे प्रसिद्ध आहे तसेच ते कॅप्टन खरातांच्या रहिवासामुळेदेखील प्रसिद्ध आहे.

मुख्यमंत्र्यांना भविष्याची चिंता?

महाविकास आघाडीची सत्ता पालटताना एकनाथ शिंदे यांची भूमिका अतिशय मोलाची होती. शिवसेनेसह अपक्ष बंडखोर आमदारांना सोबत घेऊन त्यांनी भाजपच्या साथीने सत्ता मिळवली असली तरीही सत्तेचा हा बंगला पत्त्यांसारखा कधीही कोलमोडू शकतो असा अंदाज विरोधकांकडून वारंवार व्यक्त करण्यात येतो. त्यातच सत्ताधारी आमदारांमध्ये अंतर्गत कुरुबुरीही ठिकठिकाणी सुरु असल्याने मुख्यमंत्री शिंदेगटासह भाजपच्या सत्तेचे भविष्य तर बघण्यासाठी कॅप्टन खरात यांच्याकडे गेले नसावेत? असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांनी मंदिरात पूजा आणि कॅप्टन खरातांशी केवळ चर्चा केली, भविष्य बघितले नाही, असेही काही गावकरी सांगतात.

मुख्यमंत्री आज शिर्डी दौर्‍यावर आले असताना मिरगांव (सिन्नर) येथील एका ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्याचे समजते. ते खरे असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहिर निषेध अंनिस करत आहे. ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. कुणी ते शास्त्र असल्याचे सिद्ध केल्यास आम्ही एकवीस लाखाचे बक्षीस ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वर्तनातून चुकीचा संदेश गेला आहे. मुख्यमंत्र्यांना रुद्र पूजा करायची होती तर ती कोणत्याही महादेव मंदिरात करता आली असती. त्यासाठी महत्वाच्या बैठका रद्द करुन मिरगावला जाण्याची गरज काय होती? मिरगाव हे कॅप्टन खरातांच्या ज्योतिषामुळेच ओळखले जाते. आमावस्येच्या दिवशी केलेली पूजा आणि भविष्य जाणून घेण्याची कथित चर्चा या अंधश्रद्धेशी निगडीत असून मुख्यमंत्र्यांसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीला हे कृत्य शोभणारे नाही. : कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -