हॅरिस पुलाखाली पाण्यात अडकली विंग कमांडर मराठे कुटुंबीयांची कार, सुटका करण्यात यश

पुण्यातील खडकीच्या बोपोडी येथील हॅरिस पुलाखालील पाण्यात एक कार अडकून पडली होती. परंतु ही कार विंग कमांडर एस.एस.मराठे यांची होती. या कारमध्ये मराठे यांच्यासह त्यांचे सर्व कुटुंब पाण्यात अडकलं होतं. मात्र, या कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढण्यात खडकी कॅन्टोन्मेंटच्या अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. मराठे यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलं, एक कुत्रा या पाण्यात अडकले होते.

मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अनेक रस्ते जलमय झाले आहेत. धरणातूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. त्यामुळे बोपोडी हॅरिस पुलाखालील रस्ता हा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. विंग कमांडर एस.एस. मराठे हे पुलाखालून गाडी काढत होते. परंतु गाडी काढत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात अडकून पडले.

कार पाण्यात अडकलीये हे लक्षात आल्यानंतर विंग कमांडर मराठे यांनी सर्वात प्रथम त्यांच्या दोन्ही मुलांना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना कारच्या छतावर बसवले. दोन्ही मुलं मदत येईपर्यंत छत्री घेऊन कारच्या छतावर बसलेली होती. तर त्यांच्या पत्नी कारच्या खिडकीत बसल्या होत्या.

दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने कोणताही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाण्यात उतरून कारमधील मराठे कुटुंबीयांची सुखरूपपणे सुटका केली.


हेही वाचा : शिवसेना फोडण्यामागे शरद पवार असल्याचे सांगणाऱ्या केसरकरांना अजितदादांचा प्रेमाचा सल्ला