घरमहाराष्ट्रYear End : संप ते समृद्धी महामार्गावरील सेवा... 'एसटी'चे वर्षभरातील महत्वाचे निर्णय

Year End : संप ते समृद्धी महामार्गावरील सेवा… ‘एसटी’चे वर्षभरातील महत्वाचे निर्णय

Subscribe

खासगी वाहनांच्या तुलनेत लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवासी एसटी महामंडळाच्या बसला प्राधान्य देतात. कमी दरात आरामदायी प्रवासाची सुविधा मिळत असल्याने प्रवाशी एसटीने प्रवास अधिक करतात. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने महामंडळाने सुधारणा करण्यासाठी २०२२ वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले.

खासगी वाहनांच्या तुलनेत लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवासी एसटी महामंडळाच्या बसला प्राधान्य देतात. कमी दरात आरामदायी प्रवासाची सुविधा मिळत असल्याने प्रवाशी एसटीने प्रवास अधिक करतात. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने महामंडळाने सुधारणा करण्यासाठी २०२२ वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. याशिवाय, या वर्षाच्या सुरूवातील सातत्याने तोट्याचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या संपाचा सामना करावा लागला होता. परिणामी, आपल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करत एसटी महामंडळाला कंत्राटी बसचालकांची वाट धरावी लागली होती. मात्र, कालांतराने राज्य शासनाने एसटी महामंडळाला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काहीशी एसटी महामंडळाची परिस्थिती सुधारली. परिणामी एसटीने आपल्या मुळ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक बदल घडवत एसटी महामंडळाने आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला व त्यानुसार अनेक महत्वाचे निर्णय घेतले. तर नेमके कोणते एसटी महामंडळाने निर्णय घेतले ते आपण जाणून घेऊयात…

एसटी महामंडळाचे निर्णय

  • एसटी महामंडळाकडून चालक भरतीबाबत मोठा निर्णय
  • बडतर्फी रद्द करण्यासाठी फक्त ५५० कर्मचाऱ्यांचे अर्ज
  • एसी स्लीपर बससाठी एसटी महामंडळाची चाचपणी
  • एसटीतील २१५ महिला चालक-वाहकांच्या भरतीला स्थगिती
  • एसटीतील कंत्राटी चालकांची नियुक्ती रद्द
  • विभागाचा खर्च न भागवल्यास नियंत्रकांवर कारवाई
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतन कपातीला तात्पुरती स्थगिती
  • यंत्र अभियंता ते सहाय्यक अधीक्षकाला बसेसच्या दैनंदिन गुणवत्ता तपासणीची सक्ती
  • औरंगाबाद विभागाला जवळपास २० इलेक्ट्रिक बस
  • एसटी कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास पर्यायी नोकरी
  • विसलोन गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी महामंडळाची बस पोहोचली
  • एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खाते आता खासगी बँकेत
  • ‘एसटी’चे तिकीटही ऑनलाइन पेमेंटने मिळणार
  • एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट
  • एसटीची दिवाळीतील ११ दिवसांत २१८ कोटींची कमाई
  • एसटीच्या सेवेत ९०० वातानुकूलित ‘मिडी बस’ दाखल करण्याचा निर्णय
  • एसटीत ४४८ चालक कम वाहकांची नियुक्ती
  • एसटीच्या पात्रता परीक्षेत पैशांच्या देवाणघेवाणीमुळे ३ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
  • जुन्या लाल परीच्या जागी नवीन बस
  • वर्षभरात नवीन बसेस घेणार
  • औरंगाबादच्या नामांतराआधीच संभाजीनगरचे बोर्ड झळकले, एसटी महामंडळाचा निर्णय वादात
  • समृद्धी महामार्गाच्या औरंगाबाद ते नागपूरदरम्यान एसटी बस सुरू

 

- Advertisement -

एसटी महामंडळाकडून चालक भरतीबाबत मोठा निर्णय

यंदा वर्षाच्या सुरूवातीला एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या संपाचा सामना करावा लागला होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीला होणारे नुकसान लक्षात घेता आणि प्रवाशांना एसटी सेवा मिळण्यासाठी एसटी महामंडळाने ७५० खासगी चालकांना कामावर दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे संप पुकारलेल्या कर्मचाऱ्यांवर नोकरीचे संकट ओढावले होते.

- Advertisement -

बडतर्फी रद्द करण्यासाठी फक्त ५५० कर्मचाऱ्यांचे अर्ज

विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपानंतर एसटी महामंडळाने अनेक संपकरी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली होती. मात्र कालांतराने तेव्हा माजी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी बडतर्फ कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाकडे अपील केल्यास त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले होते. परंतु, त्या आवाहनाला कर्मचाऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी एसटी महामंडळाने १० हजार २७५ कर्मचारी बडतर्फ केले असून ५५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी महामंडळाकडे अपील केले होते.

एसी स्लीपर बससाठी एसटी महामंडळाची चाचपणी

खासगी प्रवासी कंपन्यांमुळे निर्माण झालेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवाशांसाठी एसी स्लीपर बस सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने चाचपणी केली होती.

एसटीतील २१५ महिला चालक-वाहकांच्या भरतीला स्थगिती

एसटी महामंडळातील बसगाड्यांमध्ये चालक आणि वाहक अशी दुहेरी भूमिका एकाच वेळी बजावणाऱ्या २१५ महिला कर्मचारी प्रथमच सेवेत रुजू होणार होत्या. तीन वर्षांपूर्वी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर त्यांना सेवेत घेण्याबाबतचा निर्णय एसटी महामंडळाने अधांतरी ठेवला. कोरोना निर्बंध आणि त्यामुळे आलेल्या आर्थिक संकटानंतर या भरतीला एसटी महामंडळाने स्थगिती दिली होती.

एसटीतील कंत्राटी चालकांची नियुक्ती रद्द

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान एसटीची वाहतूक काही प्रमाणात सुरू ठेवण्यासाठी महामंडळाने कंत्राटी चालकांची नियुक्ती केली होती. मात्र, कालांतराने ही नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यानुसार, महामंडळाने जवळपास ८०० चालकांचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी गतवर्षी ऑक्टोबरमध्ये संप सुरू केला होता. त्यावेळी सेवा सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर चालकांची भरती करण्यात आली. एप्रिलमध्ये या चालकांचे कंत्राट वाढवण्यात आले. मात्र, कालांतराने नियमित कर्मचारी रुजू झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश एसटीच्या वाहतूक विभागाने राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले.

विभागाचा खर्च न भागवल्यास नियंत्रकांवर कारवाई

कोरोना निर्बंध आणि कर्मचारी संपामुळे एसटीची ढासळलेली आर्थिक स्थिती काही दिवसांनी पूर्वपदावर येत होती. मात्र, तरीही अनेक आगारांचे उत्पन्न वाढले नव्हते. परिणामी संबंधित विभाग नियंत्रक कार्यालये ही कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधन, साहित्य आणि स्थानकावरील विविध खर्च भागवत नव्हते. शिवाय, देयकांसाठी ‘एसटी’च्या मध्यवर्ती कार्यालयाकडे निधीची मागणी करत होते. त्यामुळे या मुद्द्यावर ‘एसटी’ महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विभाग नियंत्रकांची बैठक घेतली होती. या बैठकीत यापुढे विभाग नियंत्रकांना प्रवासी भारमान किमान १० टक्केने वाढवावे लागेल. त्यातूनच त्यांच्या विभागाचे सगळे खर्च भागवावे लागणार आहेत, अशी सूचना करण्यात आली होती. त्याशिवाय, मध्यवर्ती कार्यालयाकडे देयकासाठी निधी मागितल्यास संबंधित विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांवर कारवाईचा इशाराही दिला होता.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतन कपातीला तात्पुरती स्थगिती

एसटी कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जून २०१८ रोजी संप केला होता. त्यावेळी महामंडळातील काही विभागांनी संपकर्त्यांचे १६ दिवसांचे तर काहींचे दोनच दिवसांचे वेतन कापले होते. परंतु मुंबई औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयामुळे महामंडळाने एका दिवसाच्या संपासाठी दोन दिवसांच्या पगार कपातीचे आदेश काढले. मात्र सणासुदीत कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता लक्षात घेऊन महामंडळाने या कपातीलाही तात्पुरती स्थगिती दिली होती. या निर्णयामुळे १६ दिवसांची कपात झालेल्यांना १२ दिवसांचे वेतन परत मिळण्याची आशा निर्माण झाली होती.

यंत्र अभियंता ते सहाय्यक अधीक्षकाला बसेसच्या दैनंदिन गुणवत्ता तपासणीची सक्ती

राज्याच्या काही भागात ‘एसटी’ बसच्या अपघाताने बऱ्याच प्रवाशांचा जीव गेला. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महामंडळाने यंत्र अभियंता ते सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकांपर्यंत सगळ्यांना दैनंदिन निश्चित संख्येने बसेसची गुणवत्ता तपासणीची सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता.

औरंगाबाद विभागाला जवळपास २० इलेक्ट्रिक बस

एसटी महामंडळाने औरंगाबाद-पुणे या मार्गावर साधारण इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याचा विचार केला होता. त्यानुसार, औरंगाबाद विभागाला जवळपास २० इलेक्ट्रिक बस देण्याची तयारीही एसटी महामंडळाने दर्शवली होती.

एसटी कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास पर्यायी नोकरी

एसटीच्या सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला पर्यायी नोकरी देण्याबाबत राज्य परिवहन महामंडळ विभागाने परिपत्रक काढले होते. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य परिवहन महामंडळाने नियमांमध्ये सुधारणा केली होती.

विसलोन गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी महामंडळाची बस पोहोचली

भद्रावती तालुक्यातील आणि वरोरा आगारातून १२ कि.मी. अंतरावर असलेल्या विसलोन गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी महामंडळाची बस पोहोचली. पहिल्यांदा बससेवा सुरू झाल्याने या गावातील ग्रामस्थ आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे या बसमुळे भद्रावती तालुक्यातील विसलोन, पळसगाव, माजरी वस्ती या भागातील गावांना या बसमुळे मोठा आधार मिळाला.

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खाते आता खासगी बँकेत

एसटी महामंडळाने भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकांशिवाय कर्मचाऱ्यांना फेडरल बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसी बँकेसारख्या खासगी बँकेमध्ये वेतन खाते उघडण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. एसटी कर्मचाऱ्यांचे बहुतांश व्यवहार स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतून चालतात. पूर्वी एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकमध्ये पगार खाते उघडणे बंधनकारक होते. मात्र, आता एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना पगार खाते उघडण्यास सूट दिली आहे.

‘एसटी’चे तिकीटही ऑनलाइन पेमेंटने मिळणार

एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमासाठी ५ हजार ॲण्ड्राईड तिकिट मशिन्स नव्याने सेवेत दाखल केल्या. या नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट

एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा सरसकट पाच हजार रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून ४५ कोटी रुपये निधी एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय झाला आहे. याआधी प्रत्येक वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीत अडीच हजार रुपये आणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये भेट दिली जात होती. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ताही मिळणार असून त्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे.

एसटीची दिवाळीतील ११ दिवसांत २१८ कोटींची कमाई

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा गाड्या, दहा टक्के भाडेवाढ आणि प्रवाशांनीही प्रवासासाठी निवडलेला एसटीचा पर्याय यांमुळे महामंडळाच्या तिजोरीत एकूण २१८ कोटी रुपये उत्पन्नाची भर पडली. सर्वाधिक उत्पन्न हे धुळे विभागातून एसटी महामंडळाला मिळाले होते. यंदा २२ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू झाली होती. मात्र दिवाळीपूर्वीच एसटी महामंडळाने राज्यात नियमित गाड्यांबरोबर दररोज १,५०० जादा गाड्या सोडल्या होत्या. याच दरम्यान २१ ते ३१ ऑक्टोबपर्यंत १० टक्के भाडे आकारणी केली.

एसटीच्या सेवेत ९०० वातानुकूलित ‘मिडी बस’ दाखल करण्याचा निर्णय

एसटी महामंडळाच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित दोन हजार बस दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापैकी सुमारे ९०० मिडी बस वातानुकूलित असल्याची माहिती महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती.

एसटीत ४४८ चालक कम वाहकांची नियुक्ती

एसटी महामंडळामध्ये २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील १,४३१ पात्र उमेदवारांची अगोदर नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरीत पात्र उमेदवारांचीही नेमणूक करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला. चालक तथा वाहक पदाच्या ४ ऑक्टोबरला झालेल्या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी २७ पुरूष उमेदवारांना नेमणुकीचे आणि २२ महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मंत्रालयात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले होते. त्यानंतर मुंबईत ३ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या महासंकल्प रोजगार मेळाव्यानिमित्त २०१९ च्या रखडलेल्या भरतीतील ४४८ जणांना एसटीत चालक कम वाहक पदासाठी नियुक्ती पत्र देण्यात आली. यामध्ये धुळे जिल्ह्यातून १२५, जळगाव जिल्ह्यात १२४, नागपूर जिल्ह्यात ८०, भंडारा ४७,परभणी जिल्ह्यात ४५ यासह नाशिक, जालना, बुलढाणा जिल्ह्यातही ही पदे भरण्यात आली होती.

एसटीच्या पात्रता परीक्षेत पैशांच्या देवाणघेवाणीमुळे ३ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

करोना काळात रखडलेल्या एसटी चालक, वाहकांच्या अंतिम पात्रता परीक्षेत उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओनंतर एसटी महामंडळाच्या मुख्यालयाने या गंभीर प्रकरणाची दाखल घेत तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. ज्योती उके (यंत्र अभियंता चालक, वर्धा), चंद्रकांत वडस्कर ( विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा), प्रमोद वाघमारे (सहाय्यक वाहतूक निरीक्षक, नागपूर) असे तिन्ही निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. चालक- वाहक पदाच्या चालन परीक्षेत तिघांची समिती होती. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशाने ही कारवाई झाली.

जुन्या लाल परीच्या जागी नवीन बस

एसटी महामंडळाने ५०० साध्या बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. या बसमध्ये आरामदायी पुश बॅक आसन सुविधा होती. तसेच, आकर्षक रंगसंगतीही होती. प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला होता.

वर्षभरात नवीन बसेस घेणार

एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण १५ हजार ८७७ हजार गाड्या असून, त्यात साध्या बस, निमआराम, स्वमालकीच्या भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध गाड्या आहेत. एसटी महामंडळाने वर्षभरात नवीन बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. एसटी महामंडळाच्या ताफ्यात ५०० लाल रंगाच्या साध्या बसेस आहेत. एसटी महामंडळाने ५०० नवीन बसेस दाखल करण्याचा निर्णय साधारण आठ ते दहा महिन्यांपूर्वीच घेतला होता. त्यानंतर ५०० पैकी ३२० बसेसच्या निविदा काढून त्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे.

औरंगाबादच्या नामांतराआधीच संभाजीनगरचे बोर्ड झळकले, एसटी महामंडळाचा निर्णय वादात

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही बसच्या डिजिटल बोर्डावर औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला होता. शिवाय, बसस्थानकांवरील फलटांवरील बोर्डांवरही छत्रपती संभाजीनगरचे बोर्ड लावले होते. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाच एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयावरून नवं राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गाच्या औरंगाबाद ते नागपूरदरम्यान एसटी बस सुरू

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर एसटी महामंडळाने या महामार्गाच्या औरंगाबाद ते नागपूरदरम्यान एसटी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १५ डिसेंबरपासून एसटी महामंडळाची ही सेवा सुरू झाली आहे. तब्बल 10 जिल्ह्यातील 26 तालुके आणि 391 गावातून जाणारा समृद्धी महामार्ग अखेर प्रवासासाठी सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार असून, प्रवास सुखकर होणार आहे.

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -