घरमुंबईमुंबईत ११ वर्षात विविध दुर्घटनांत १ हजार ५२५ जणांचा बळी

मुंबईत ११ वर्षात विविध दुर्घटनांत १ हजार ५२५ जणांचा बळी

Subscribe

११ वर्षात ८५ हजार ६९४ दुर्घटना, दरवर्षी सरासरी ७ हजार ७९० दुर्घटना, सरासरी १३८ मृत्यू ४८९ जखमी

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात दररोज कुठे ना कुठे, लहान- मोठ्या दुर्घटना घडत असतात. त्यात कमी- अधिक प्रमाणात जीवित व वित्तीय हानी होते. विशेषतः पावसाळ्यात तर मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडतात. २०१० ते २०२० या ११ वर्षांच्या कालावधीत मुंबईत विविध प्रकारच्या ८५ हजार ६९४ दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, १,५२५ जणांचा मृत्यू झाला असून ५,३८६ जण जखमी झाले आहेत.

राज्य सरकार व महापालिका प्रशासन या दुर्घटना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करते मात्र तरीही काही कारणास्तव त्यात काही हलगर्जीपणा, निष्काळजीपणा होऊन शेवटी दुर्घटना घडणे, त्यात शेकडो लोकांचा बळी जाणे आणि शेकडी लोक जखमी होणे, हा दरवर्षीचा नित्यक्रम काही थांबत नाही.

- Advertisement -

मुंबई शहर हे देशाचे आर्थिक राजधानीचे आणि श्रीमंत शहर आहे. या शहराची लोकसंख्या १.७० कोटींच्या घरात असून दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत मिठी, पोयसर, दहिसर अशा नद्या, मोठमोठे नाले, झोपडपट्टया, जुन्या इमारती, झोपडीवजा बेकायदा बहुमजली इमारती,झोपडपट्टीतील लघु उद्योग, टपर्‍या, हॉटेल्स, केमिकल कंपन्या आहेत. बाजूला अथांग समुद्र, खाडी आहे. वाहनांची वाढती संख्या. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास नद्या, नाले तुडुंब होऊन वाहू लागतात. मुंबईची तुंबई होते.

अशा या मुंबईत विविध प्रकारच्या शेकडो दुर्घटना घडतात. यामध्ये, काही दुर्घटना या अचानकपणे तर काही सरकार, पालिका, प्राधिकरण यांचा हलगर्जीपणा, मानवी स्वभाव, स्वार्थीपणा आणि निष्काळजीपणा आदी कारणामुळे या दुर्घटना घडतात. त्यामध्ये शेकडो लोक जखमी होतात, तर अनेकांचा नाहक मृत्यू होतो. शिवाय मोठी वित्तीय हानीही होते.

- Advertisement -

११ वर्षात ८५,६९४ दुर्घटनांत १५२५ मृत, ५३८६ जखमी

गेल्या २०१० पासून ते २०२१ या ११ वर्षांच्या कालावधीत मुंबई शहर व उपनगरात दरड कोसळणे, घर, इमारत,झाडे, यांची पडझड, समुद्र, नद्या, नाले, विहीर, खाडी यात बुडणे, रस्त्यावर ऑइल पडणे, मॅनहोलमध्ये पडणे, गॅस गळती, आग व शॉर्टसर्किट आदी विविध प्रकारच्या तब्बल ८५ हजार ६९४ दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये, ५ हजार ३८६ लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक किरकोळ ते गंभीर जखमी झाले आहेत. काहीजण अव्यव गमावल्याने कायमचे दिव्यांग झाले आहेत. तर १ हजार ५२५ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरवर्षी सरासरी ७७९० दुर्घटना, १३८ मृत्यू, ४८९ जखमी

मुंबईत दरवर्षी सरासरी ७ हजार ७९० दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये दरवर्षी सरासरी ४८९ जण किरकोळ ते गंभीर जखमी झाले असून १३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते.

कोणत्या दुर्घटना, किती मृत, जखमी

मुंबईत गेल्या ११ वर्षात, समुद्र, खाडी, विहीर, नद्या, नाले, मॅनहोल, खड्डे यात लहान मुले ते मोठी माणसे पडण्याच्या व बुडण्याच्या १,२५३ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, ६६१ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २८४ जण जखमी झाले आहेत. तसेच, आग लागणे व शॉर्टसर्किट यांच्या तब्बल ३३,७८७ दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये ३६१ जणांचा मृत्यू झाला तर २,३२० लोक जखमी झाले आहेत. दरड कोसळण्याच्या १७८ दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये २२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ३४ जण जखमी झाले आहेत.

त्याचप्रमाणे, दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत जुनी घरे, धोकादायक इमारती, बेकायदा झोपडीवजा बहुमजली इमारत यांच्या पडझडीच्या दुर्घटना घडतात. गेल्या ११ वर्षात ६,००६ दुर्घटनांमध्ये ३८२ जणांचा मृत्यू झाला असून १६२४ जण जखमी झाले आहेत. मुंबईत केमिकल कंपनीत, रस्त्यावरील गॅस टँकर आणि घरातील घरगुती गॅस यांच्या गळतीच्या २,९६५ दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये, १६ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून त्यात २९० जण जखमी झाले आहेत.
रस्त्यावर वाहनातील ऑइल सांडून वाहन अपघात झाल्याच्या २,७४८ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, ३४ जणांचा मृत्यू झाला तर ४१९ जण जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे, मुंबईत पावसाळ्यात अथवा चक्रीवादळ यांमुळे झाडे, झाडांच्या फांद्या यांच्या पडझडीच्या ३८,७५७ दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, ४९ लोकांचा मृत्यू झाला असून ४१५ जण जखमी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -