घरमुंबई'संजू'वर टीका केली म्हणून जीवे मारण्याची धमकी!

‘संजू’वर टीका केली म्हणून जीवे मारण्याची धमकी!

Subscribe

'संजू' चित्रपटावर टीका केल्यामुळे तुषार देशमुख यांना धमकीचे फोन आले. धक्कादायक बाब म्हणजे तुषार यांना धमकीचे फोन येण्याची ही पहिली वेळ नाही.

”संजू बाबा के बारे मे बोलना नही बंद करोगे तो , १९९३ ब्लास्ट में आपके माँ के जैसे तुकडे किये थे वैसे आपके भी तुकडे करेंगे और उसका इंतजाम हमने किया है…”  खरंतर हे वाचून तुम्हाला हा एखाद्या चित्रपटातील संवाद वाटेल. मात्र हा चित्रपटातील संवाद नसून, १९९३ बाॅम्ब ब्लास्ट प्रकरणातील पीडित तुषार प्रिती देखमुख यांना आलेला धमकीचा फोन आहे. संजू सिनेमाबद्दल एका खासगी वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये, तुषार प्रिती देशमुख यांनी संजय दत्त देशद्रेही आहे अशी टीका केली होती. तसंच तुषार यांनी संजू सिनेमावर आक्षेपही नोंदवला होता. त्यामुळे मुलाखतीच्या दुसऱ्याच दिवशी तुषार यांच्या मोबाईलवर अचानक एक निनावी फोन आला आणि फोनवरुन त्यांना अशाप्रकारची धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे तुषार यांच्यासोबत हा प्रकार पहिल्यांदाच घडला नसून याआधीही त्यांना असे धमकीचे फोन आल्याचे, त्यांनी माय महानगरशी बोलताना सांगितले.

याआधीही आल्या होत्या धमक्या

”१९९३ च्या ब्लास्ट प्रकरणानंतर संजय दत्त याला पूर्ण शिक्षा होऊ नये यासाठी त्यावेळी अनेकांनी अर्ज केले होते. याबाबत बोलण्यासाठी मी त्यावेळचे राज्यपाल अलेक्झांडर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मला त्यांना भेटता आले नाही. मात्र, तुम्ही मीडियाशी काही बोलू नका किंवा यातून तुम्हाला काय मिळणार अशा विविध माध्यमातून मला धमक्या दिल्या गेल्या”, असा गौप्यस्फोट तुषार यांनी महानगरशी बोलताना केला. ‘जेव्हा याकुब मेमनला फाशी होणार होती त्याच्या आदल्याच दिवशी मला एकाच नंबरवरून तब्बल २७ मिसकॉल आले होते. मी जेव्हा त्या नंबरवर फोन केला तेव्हा ”हमारे याकुब मेमन को फाशी होती है तो आपके भी फाशी का इंतजाम हमने किया है” , अशी धमकी मला समोरुन देण्यात आल्याचं, तुषार यांनी सांगितले.

- Advertisement -

पोलिसांकडून उदासीन प्रतिसाद

याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी तुषार देखमुख ज्यावेळी माहिम पोलिस ठाण्यात गेले, त्यावेळी त्यांच्याकडून अदाखल पात्र गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र, जेव्हा तुषार याप्रकरणाची एफआयआर नोंदवून घेण्याची मागणी करू लागले तेव्हा पोलिसांकडून त्यांची दखल घेतली गेली नाही. अखेर वरिष्ठांशी बोलल्यावर एफआयआर दाखल करून घेण्यात आली मात्र, फक्त तुमच्या मन:शांतीसाठी आम्ही ती नोंदवून घेत आहोत, असं माहिम पोलिसांकडून देशमुख यांना सांगण्यात आलं. तुषार यांनी स्वत: माय महानगरला याविषयीची माहिती दिली. दरम्यान धमकी देणाऱ्या नंबरबाबत माहिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याकडून माहिती घेतली असता, ‘तपास सुरू असून हा नंबर बाहेरचा असल्यामुळे शोध लागण्यास उशीर होतोय’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचे, तुषार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -