घरमुंबईशिक्षण समिती अध्यक्षांकडून गोपनीयतेचा भंग

शिक्षण समिती अध्यक्षांकडून गोपनीयतेचा भंग

Subscribe

महापौर पुरस्काराची घोषणा आधीच ,पुरस्कार गैरपद्धतीने दिल्याचा शिक्षकांचा आरोप

शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील शिक्षकांची पाच वर्षातील कामगिरी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या विविध शाळांमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने गौरवण्यात येते. परंतु यावर्षी हे पुरस्कार गैरपद्धतीने व राजकीय हितसंबंध असलेल्या शिक्षकांना दिल्याचा आरोप पालिका शाळेतील शिक्षकांकडून करण्यात येत आहे. तसेच पुरस्काराची घोषणा महापौरांकडून होण्यापूर्वीच शिक्षण समिती अध्यक्षांनी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात नावाची घोषणा करून पुरस्काराच्या गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, सामाजिक कार्यामध्ये पुढाकार असलेले व विद्यार्थ्यांसाठी सतत काम करणार्या शिक्षकांची मुंबई महापालिकेकडून आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी निवड केली जाते. पुरस्कारासाठी जुलैमध्ये अर्ज प्रक्रिया राबवल्यानंतर 23 ऑगस्टला पुरस्कार जाहीर करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील तब्बल 50 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला. आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराची घोषणा ही महापौरांकडून केली जाते.

- Advertisement -

पुरस्काराची घोषणा होईपर्यंत निवड झालेल्या शिक्षकांची नावे गोपनीय ठेवली जातात. परंतु 15 ऑगस्टला वाशी नाका येथील श्री गणेश विद्यामंदिर अ‍ॅण्ड ज्यूनिअर कॉलेजमधील कार्यक्रमाला शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात अंजली नाईक यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा पवार यांना पुरस्कार मिळाल्याचे जाहीर केले, अशी माहिती शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांकडून देण्यात आली. महापौरांकडून 23 ऑगस्टला नाव जाहीर होण्यापूर्वीच शिक्षण समिती अध्यक्षांनी नाव जाहीर केल्याने या पुरस्काराच्या गोपनीयतेबाबत शिक्षकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे या पुरस्कारासाठी आवश्यक बाबींची पुर्तता करणार्‍या शिक्षकांऐवजी राजकीय हितसंबंध असलेल्या शिक्षकांना प्राधान्य दिल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. एम वॉर्डमधील एका शाळेतील शिक्षक दोन वर्षे शिक्षण विभागात क्लार्क म्हणून कार्यरत होते. नुकतेच जूनमध्ये ते एका शाळेत रूजू झाले. त्यामुळे त्यांचे पुरस्कार मिळावे असे कोणतेच शैक्षणिक व सामाजिक कार्य नाही. महापौर पुरस्कारासाठी पाच वर्षांची शैक्षणिक कामगिरी लक्षात घेण्यात येत असताना या शिक्षकाला फक्त एक महिन्याच्या कामगिरीवरच पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच एम वार्डमधीलच अन्य एक शिक्षिका शाळा सुरू असताना अनेकदा वैयक्तिक कामासाठी शाळेबाहेर फिरत असताना आढळली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाशी काहीही देणेघेणे नसलेल्या या शिक्षिकेचे राजकीय पक्षाशी संबंध असल्याने तिला पुरस्कार देण्यात आला आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी झटणार्‍या व अधिकाधिक विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी प्रयत्नशील असणारे शिक्षक अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराचे ते खरे मानकरी असतानाही कोणतेही राजकीय हितसंबंध नसल्याने अनेक वर्षांपासून ते पुरस्कारापासून वंचित असल्याची खंत शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -