अजित पवार याचं शरद पवारांकडून कौतुक; ते नावासाठी काम करत नाहीत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (5 मे) अध्यक्षपदावर काय राहण्याची घोषणा केली आणि दोन दिवसांपासून जे राजकीय वातावरण ढवळून निघत होते ते त्यांनी शांत केले. यानंतर ते आज बारामती दौऱ्यावर होते. यावाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य करताना अजित पवार यांचे कौतुक केले. ते म्हणालेकी, अजित पवार हे जमिनीवर काम करणारे आहेत. ते फार माध्यमस्नेही नाहीत.

माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचा एक गट अजित पवारांबरोबर बाहेर जाण्याची सातत्याने चर्चा का होते? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, सातत्याने काही घडलं का? काही लोक प्रचार करतात. काहींच्या कामाची पद्धत वेगळी असते. मी कुठेही गेलो, तर माध्यमांना बोलवतो. पण, अजित पवार हे जमिनीवर काम करणारे आहेत. ते फार माध्यमस्नेही नाहीत. काहीजण वृत्तपत्रात नाव कसे येईल, याची काळजी घेतात. अजित पवारांना वृत्तपत्रात प्रसिद्धीची चिंता नसते. आपण हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याची त्यांना चिंता असते. हा स्वभावातला फरक आहे. त्यामुळे असे गैरसमज पसवले जातात, अशी बाजू घेत शरद पवार उत्तर दिले.

स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढं जाण्याची आवश्यकता
बारसूतील आंदोलनाबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, त्या गावातील शेतकऱ्यांशी मी स्वत:हा चर्चा केली असून त्यांचे प्रश्न समजून घेतले आहेत. उद्योगमंत्री आणि त्या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांशी माझ्या बैठकाही झाल्या आहेत. प्रकल्पामुळे पर्यावरण, शेती, मत्स्यव्यसायाचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आवश्यकता आहे. सक्तीने किंवा पोलिसांचा वापर करून हा प्रकल्प यशस्वी होऊ शकणार नाही आणि ते योग्यही नाही,” अशी भूमिका बारसू रिफायनरी प्रकल्पाबद्दल शरद पवार यांनी मांडली. यावेळी सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत उत्तर देताना म्हटले की, न्यायालयात ज्यांच्याविरोधात केस आहे, त्यांच्याविरुद्ध निकाल लागला, तरी विधानसभेतील बहुमतावर काहीही परिणाम होणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवासांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भुकंप होणार अशी चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांनी ‘लोक माझा सांगती’ या आत्मकथेच्या दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपद सोडत असल्याचे भाष्य केले. त्यानंतर दोन दिवस राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दर्शविली. भिवंडीमधील युवा अध्यक्षाने आत्मदहनाचा प्रयत्न केला त्यामुळे अखेर शरद पवारांना पुन्हा अध्यक्षपद स्विकारावे लागले. त्यानंतर ते बारामती दौऱ्यावर होते.