घरमुंबईसर्व होलसेल भाजीपाला बाजार आता थेट मुंबईच्या सीमेवरच!

सर्व होलसेल भाजीपाला बाजार आता थेट मुंबईच्या सीमेवरच!

Subscribe

वांद्रे कुर्ला येथील बाजार बंद, सोमय्यातील बाजारही होणार बंद

दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावर भरल्या जाणाऱ्या घाऊक भाजी मार्केटचे विक्रेंद्रीकरण करत उपनगरांमध्ये बाजार सुरु करण्यात आले होते. परंतु आता तेही बाजार बंद करून घाऊक अर्थात होलसेल भाजीपाला विक्री थेट मुंबईच्या सीमेवर केली जाणार आहे. मुंबईच्या सीमा असलेल्या महापालिकेच्या जुन्या जकात नाक्यांच्या ठिकाणी यापुढे होलसेल भाजी ट्रक उभे करत तेथूनच याची विक्री केली जाणार आहे. मात्र या होलसेल विक्रेत्यांनाच याठिकाणांहून भाजी विकता येणार आहे. त्यामुळे किरकोळ विक्री केल्यास संबंधित शेतकरी अथवा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

वांद्रे कुर्ला, सोमय्यातील बाजारही होणार बंद

दादर येथील घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये दरदिवशी राज्याच्या विविध जिल्ह्यामधून घाऊक भाजीपाला विक्रीसाठी येत असतात . दरदिवशी राज्यातील अनेक भागांमधून मुंबईतरील या दादर भागांमध्ये भाजीचे २०० ट्रक येतात. तसेच छोट्या, मोठ्या वाहनांमधून १ हजार भाजी विक्रेते याठिकाणी येत असल्याने याठिकाणच्या गर्दीचे प्रमाण नियंत्रण विविध उपाययोजना करूनही ही गर्दी कमी करण्यात महापालिका आणि पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे दादरचे हे घाऊक मार्केट तात्पुरत्या स्वरुपात बंद करून सोमय्या मैदान, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान, मुलुंड जकात नाका, दहिसर जकात नाका आदी ठिकाणी या शेतकऱ्यांसाठी भाजी मार्केट उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये कोरोना बाधित तसेच त्यांच्या संपर्कातील लोकांसाठी क्वारंटाईनची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे येथील भाजी मार्केट बंद करण्यात आले आहे. तर सोमय्या मैदानावरील भाजी मार्केट येत्या आठवड्याच्या आत बंद केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

- Advertisement -

होलसेल भाजी विक्रीची व्यवस्था केली जाणार

वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेचे सर्व जकात नाके बंद असल्याने येथील सर्व जागांवर आता बाहेरुन येणाऱ्या शेतकऱ्यांचे ट्रक उभे करत त्यातून होलसेल भाजी विक्रीची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी मुलुंड, ऐरोली वाशी-मानखुर्द,दहिसर आदी ठिकाणी होलसेल भाजी विक्रीची व्यवस्था केली जाणार आहे. मुंबईतील भाजी विक्रेते या होलसेल बाजारात जाऊन भाजी खरेदी करू शकतील. प्रत्येक होलसेल भाजी विक्रीच्या ट्रकना महापालिकेच्यावतीने पास वितरीत केली जातील. त्याप्रमाणे त्यांना भाजी विक्री करता येईल. परंतु याठिकाणी होलसेल व्यतिरिक्त कोणालाही भाजी विकता येणार नाही. केवळ होलसेल भाजी विक्रेत्यांनाच शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करता येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.


Corona: गेल्या २४ तासांत देशात २,२९३ नवीन रुग्ण; महाराष्ट्रात सर्वाधिक!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -