किळसवाणा प्रकार: ९ वर्षीय मुलीचा रिक्षाचालकाकडून लैंगिक छळ

molestation
प्रातिनिधीक फोटो

आपल्या तीन लहान मुलांना सोबत घेऊन चष्मा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गरिब महिलेच्या ९ वर्षीय मुलीचा उल्हासनगरात एका रिक्षाचालकाने रिक्षातच लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी घडला. संतप्त झालेल्या मुलीच्या आईने त्या रिक्षा चालकाला चपलीने बदडवत पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच त्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकली. या प्रकरणी महिलेने विठ्ठलवाडी पोलिसांना त्या रिक्षाचालकाची माहिती दिली असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

भर दिवसा हा प्रकार रहदारीच्या रस्त्यावर घडल्याने महिला वर्गांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. कर्जत परिसरात राहणारी महिला उल्हासनगरात चष्मा विक्रीचा व्यवसाय करते. तिला ४ मुले असून आपल्या ३ लहान मुलांना सोबत घेऊन ती आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्याच्या कडेला चष्मा विक्रीचा व्यवसाय करते. कॅम्प ४ परिसरात ती चष्माच्या व्यवसाय ज्या ठिकाणी करते त्या ठिकाणी रिक्षा लाईनला लावलेल्या असतात. या रिक्षा लाईनमध्ये त्या महिलेच्या ओळखीचा एक रिक्षाचालक लहान मुलांना ओळखत असल्याने ९ वर्षीय लहान मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. खाऊ आणण्यासाठी रिक्षा घेऊन जात असताना वाटेत त्याने रिक्षा थांबवून त्या रिक्षातच त्या लहान मुलीसोबत लैंगिक चाळे करू लागला. रिक्षाचालकाने लहान मुलीच्या अंगावरील शर्टाचे बटन देखील तोडले. भयभीत झालेल्या मुलीने रिक्षातून पळ काढत आपल्या आईकडे धाव घेतली. घडलेला प्रकार आईला सांगताच त्या महिलेने रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला पकडून या घटनेचा जाब विचारत त्याला चपलीने झोडले. इतर नागरीकांच्या मदतीने पोलिस ठाण्यात घेऊन जाणार तितक्यात त्या रिक्षाचालकाने रिक्षासहीत पलायन केले.

भयभीत झालेल्या आपल्या मुलीला त्या महिलेने शांत केल्यावर या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ती तक्रार करण्यास घाबरत होती. सध्या विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असला तरी आम्ही त्या रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी सांगितले.

एमएच ०५ बीजी – १०६३ या रिक्षात त्या मुलीवर हा प्रकार घडल्याने पोलिसांनी त्या रिक्षाच्या नंबरवरून त्या रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे. त्याचे नाव देखील पोलिसांना समजले असून रात्री उशीरा पोलिसांनी ती रिक्षा ताब्यात घेतली. भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे महिला वर्गांमध्ये संंतापाचे वातावरण पसरले आहे.