घरमुंबईबीकॉमचे हॉल तिकीट मोबाईल अ‍ॅपवर

बीकॉमचे हॉल तिकीट मोबाईल अ‍ॅपवर

Subscribe

प्रथमच परीक्षाआधी २० दिवस हॉल तिकीट उपलब्ध

विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर त्यांना प्रवेशाची सर्व माहिती इत्थंभूत मिळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या mum e-suvidha हा अ‍ॅप सुरू केला आहे. अ‍ॅपला मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे यावर्षी मुंबई विद्यापीठाने प्रथमच अ‍ॅपवर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हॉल तिकिटातील चुकांमुळे परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी विद्यापीठाने अ‍ॅपवर परीक्षेपूर्वीच 20 दिवस आधी हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हॉल तिकीटमधील दुरुस्ती करणे सोपे होणार आहे.

बीकॉम सत्र ६ ची परीक्षा ३ एप्रिलपासून सुरू होत आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू नये यासाठी शुक्रवारपासूनच विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यास सुरुवात झाली आहे. विद्यापीठाकडून आतापर्यंत 57 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेच्या 20 दिवस अगोदरच बीकॉमच्या विद्यार्थ्यांना प्रथमच हॉल तिकीट देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेली हॉल तिकिटे विद्यार्थ्यांच्या ई-सुविधाच्या लॉगिनमध्ये, महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये व ई-सुविधाच्या मोबाईल अ‍ॅपवरील लॉगिनमध्येही उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी ई-सुविधाच्या लॉगिनसाठी पीआरएन क्रमांक दिला जातो. हा पीआरएन क्रमांक हा यूजर आयडी म्हणून वापरला जातो. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना ई-सुविधेचा पासवर्डही देण्यात आलेला असतो. पीआरएन क्रमांक व पासवर्डच्या सहाय्याने ई-सुविधा मोबाईल अ‍ॅपवर लॉगिन करता येते.

- Advertisement -

२० मार्चपर्यंत प्रवेशपत्रात दुरुस्ती
अनेकदा विद्यार्थ्यांचे छायाचित्र व स्वाक्षरी ही प्रथम वर्षात प्रवेश घेतानाची असते. त्यामुळे तीन वर्षांनंतर त्यात बदल होण्याची शक्यता असते. विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांचे आडनाव, नाव, वडिलांचे नाव व आईचे नाव अशी क्रमवारी आवश्यक असते. नावाचा तपशील देवनागरी लिपीत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे छायाचित्र व स्वाक्षरीत काही बदल असण्याची शक्यता असू शकते किंवा विषयामध्येही काही दुरुस्ती असण्याची शक्यता असते. दुरुस्तीसाठी विनंती अर्ज विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाकडे करायची आहे. महाविद्यालयांनी दुरुस्त्या विद्यापीठाकडे पाठविल्यास, त्याचा तपशील दुरुस्त केला जाईल. या दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांनी २० मार्चपूर्वी विनंती करायची आहे.

पाचव्या सत्राचीच परीक्षा केंद्रे
बीकॉम सत्र 5 ची परीक्षा ज्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्याच केंद्रावर त्यांना सत्र 6 ची परीक्षा द्यायची आहे. ही परीक्षा केंद्रे व त्यांचा पत्ता सत्र ६ च्या हॉल तिकिटावर देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रासाठी शोधाशोध करावी लागणार नाही.

- Advertisement -

विद्यापीठाकडून प्रथमच विद्यार्थ्यांना २० दिवस आधी हॉल तिकीट देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र शोधणे, हॉल तिकीटावरील दुरुस्तीसाठी वेळ मिळेल. अन्य परीक्षांचे हॉल तिकीटही अशाप्रकारे लवकरच देण्याचा विचार आहे.
-डॉ सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -