घरठाणेरेल्वे प्रवासासाठी बोगस ओळखपत्र; मुंबई पालिका कर्मचार्‍याला अटक

रेल्वे प्रवासासाठी बोगस ओळखपत्र; मुंबई पालिका कर्मचार्‍याला अटक

Subscribe

रेल्वे प्रवासासाठी बोगस ओळखपत्र देणारा बृहन्मुंबई महापालिका कर्मचार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोरोना महामारी रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवास बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रेल्वेने प्रवास करू शकतात. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी लागणारे अत्यावश्यक सेवेतील बोगस ओळखपत्र देण्याचा प्रताप करणार्‍या २८ वर्षीय धनंजय बनसोडे याला कल्याण रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ बनावट ओळखपत्रांसह ओळखपत्र तयार करण्याचे फॉर्म आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा स्टॅम्प आणि सही शिक्का पोलिसांनी जप्त केला आहे. रेल्वे कोर्टाने या आरोपीला तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

आरोपी हा बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करत होता. तीन महिन्यांपासून त्याला पगार मिळत नसल्याने पैशांची जमवाजमव कशी करायची, या विवंचनेत असलेल्या धनंजय याला प्रवासादरम्यान नागरिक ओळखपत्र कोठे मिळेल, अशी विचारणा करताना आढळल्याने त्याने तीन दिवसांपासून बनावट ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय घेतला, यासाठी त्याने काम करत असलेल्या कार्यालयातून रबर सही शिक्क्याचा स्टॅम्प आणि कोरे फॉर्म मिळवले.

- Advertisement -

सोशल मीडियावरून आवाहन
यानंतर त्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वे प्रवास सवलत मिळण्यासाठी कोणाला ओळखपत्र हवी असतील तर आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फेसबुकमार्फत केले होते. हा मेसेज अज्ञात व्यक्तीने रेल्वे आयुक्तांना पाठवल्यानंतर रेल्वे आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधत बनावट ग्राहक बनून त्याला कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर पकडले. मागील तीन दिवसात त्याने ९ ओळखपत्र तयार करून दिली असून यातील ४ कार्ड आणि कार्ड बनविण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस नाईक अजित माने यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -