Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुंबईतील विविध प्रकल्पांसाठी 'विशेष प्रकल्प निधी' ची तरतूद

मुंबईतील विविध प्रकल्पांसाठी ‘विशेष प्रकल्प निधी’ ची तरतूद

मुंबईतील पूरस्थिती रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेला शहर व उपनगरात विविध ठिकाणी पुलांची बांधणी करणे, नवीन पाणी प्रकल्प उभारणे, मिठी नदी अन्य नद्यांची कामे, नाल्यांची सफाई, बांधणी करणे, पूरस्थिती रोखण्यासाठी उपाययोजना करणे आदी विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तब्बल ७ हजार ८८४ कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता आवश्यकता आहे. कोरोनाच्या कालावधीत या महत्वाच्या प्रकल्पांची कामे रखडल्यास हे विविध प्रकल्प प्रलंबित राहणार आहेत. तसे होऊ नये यासाठी पालिकेने नव्याने स्वतंत्र निधीची उभारणी करण्यासाठी ‘दिर्घकालीन आर्थिक धोरण’ तयार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या महत्वाच्या प्रकल्पांसाठी ‘विशेष प्रकल्प निधी’ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

वास्तविक, पालिकेच्या विविध बँकामध्ये ८० हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. त्यावरील व्याजावरच पालिकेची बरीचशी कामे मार्गी लागत आहेत. या ८० हजार कोटी रुपयांच्या निधीत पालिका कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतर जी देणी देय आहेत, त्याची रक्कम (अंदाजे २२% – २५%) अंतर्भूत आहे. तसेच, पालिकेची कंत्राटकामे घेणाऱ्या कंत्राटदारांची अनामत रक्कमही काही प्रमाणात अंतर्भूत आहे. उर्वरित निधी हा पालिकेने नवीन पाणी प्रकल्प, एसटीपी प्रकल्प, मिठी नदी विकास, कोस्टल रोड आदी प्रकल्पांसाठी राखून ठेवला आहे.

- Advertisement -

मात्र आता मुंबईतील कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेला या ठेवींचा वापर काही प्रमाणात करणे आवश्यक झाले आहे. तर दुसरीकडे पालिकेला प्रस्तावित प्रकल्प आगामी काळात मार्गी लावण्याचे आव्हान समोर आहे. त्यामुळे या परिस्थितीत पालिकेने १२ पुलांची कामे, मिठी व इतर नद्यांची कामे, नाले रुंदीकरण, बांधणी, नवीन पंपिंग स्टेशन उभारणे, बोगद्यांची कामे करणे, मुंबईतील पूरस्थिती रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आदी महत्वाच्या कामांसाठी आवश्यक असलेला ७ हजार ८८४ कोटी रुपयांचा निधी स्वतंत्रपणे उभारण्याचा व त्यासाठी ‘विशेष निधी’ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२१ – २२ पासून हा ‘ विशेष प्रकल्प निधी’ उभारण्यासाठी अर्थसंकल्प ‘अ’ अंतर्गत २ हजार कोटी रुपये आणि अर्थसंकल्प ‘ ग’ अंतर्गत २ हजार कोटी रुपये असे एकूण ४ हजार कोटींचा निधी संचित वर्ताळयामधून वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. या प्रस्तावावर खरमरीत चर्चा होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -