संदीप कुदळे यांच्याविरोधातील गुन्हा हायकोर्टाकडून रद्द; मंत्री चंद्रकांत पाटलांवर केली होती टीका

संग्रहित छायाचित्र

मुंबईः मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी पुणे येथील कॉंग्रेस कार्यकर्ते संदीप कुदळे यांच्याविरोधात नोंदवलेले दोन गुन्हे उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केले. तसेच हा गुन्हा नोंदवल्याप्रकरणी कुदळे यांना २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. हा गुन्हा नोंदवण्यासाठी जबाबदार असलेल्यांकडून दंडाची रक्कम घ्यावी. त्यांच्या वेतनातून ही रक्कम घ्यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत मंत्री पाटील यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्याच्या निषेधार्थ कुदळे यांनी टीका करणारी पोस्ट टाकली होती. याप्रकरणी कोथरुड व वारजे मालवाडी पोलीस ठाणे येथे कुदळे यांच्याविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हे दोन्ही गुन्हे रद्द करण्यासाठी कुदळे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. adv सुबोध देसाई यांनी कुदळे यांच्यावतीने युक्तिवाद केला. कुदळे यांच्याविरोधात कोणताच गुन्हा सिद्ध होत नाही. दाखल झालेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित आहे. नाहक त्रास देण्यासाठी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोणतेही कारण न देता त्यांना अटक झाली. दोन दिवस ते पोलीस कोठडीत होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार मला घटनेने दिला आहे. या अधिकारावर गदा आणली जाऊ शकत नाही. त्यामुळे हे गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी adv देसाई यांनी न्यायालयात केली.

कुदळे यांच्या याचिकेला राज्य शासनाने विरोधत केला. कुदळे यांच्याविरोधात नोंदवलेला गुन्हा योग्यच आहे. कुदळे यांनी जाणीवपूर्वक तो व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला होता. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असा दावा advocate general डॉ. बिरेंद्र सराफ यांनी केला.

पोलिसांचे काम हे कायदा व सुव्यवस्था राखणे आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारे गुन्हा नोंदवणे चुकीचे आहे. हे दोन्ही गुन्हे नोंदवताना पोलिसांनी डोके वापरायला हवे होते, असे खडेबोल सुनावत न्यायालयाने कुदळे यांच्याविरोधातील दोन्ही गुन्हे रद्द केले.