घरमुंबईकेडीएमसीची दोन्ही रुग्णालये लवकरच शासनाकडे हस्तांतरीत!

केडीएमसीची दोन्ही रुग्णालये लवकरच शासनाकडे हस्तांतरीत!

Subscribe

सरकारने माहिती मागवली

जनतेला अद्यावत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पालिकेची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालये शासनाने आपल्या ताब्यात घ्यावीत या कल्याण डोंबिवली पालिकेच्या मागणीला राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे अवर सचिव नवनाथ बाठ यांनी पालिका रुग्णालयातील सद्यस्थितीची माहिती तातडीने पालिका प्रशासनाकडे मागितली आहे. तब्बल 7 वर्षापासून प्रलंबित असलेल्या या विषयाला आता चालना मिळाली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 15 लाख लोकांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कल्याणात रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीत शास्त्रीनगर ही दोन रुग्णालये उभारली आहेत. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे या रुग्णालयात रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे शासनाने दोन्ही रुग्णालये हस्तांतरीत करून घ्यावीत असा ठराव 2012 मध्ये महासभेच्या मान्यतेने प्रशासनाने शासनाकडे पाठवला होता. 7 वर्षापासून प्रलंबित असलेल्या या विषयाला आता चालना मिळाली आहे. पालिकेची दोन्ही रुग्णालये हस्तांतरित करून घेण्याच्या प्रस्तावानुसार रुग्णालयातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.

- Advertisement -

यात पालिका क्षेत्रातील आरोग्य सुविधाची सद्यस्थिती काय आहे, पालिकेच्या दोन्ही रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची पदसंख्या, रिक्त पदाची संख्या किती? ही रुग्णालये पालिकेच्या सेवेत समाविष्ट केली गेल्यास शासनाच्या सेवेत समावेशनाला इच्छुक अधिकारी कर्मचारीची संख्या आणि शासनाच्या सेवेत समावून घेण्यास तयार नसलेले कर्मचारी किती आणि रुग्णालये हस्तातरणानंतर या कर्मचार्‍याची सेवा कुठे वर्ग करता येऊ शकेल. रुग्णालयाची जमीन पालिकेच्या मालकीची आहे का? रुग्णालयाची इमारत कोणाच्या मालकीच्या आहे ? अशी प्रश्नावली राज्याचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी पालिका प्रशासनाला पाठवली असून माहिती मागविली आहे. मात्र ही माहिती तातडीने शासनाकडे पाठविण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेची दोन्ही रुग्णालये शासनाकडे वर्ग झाल्यानंतर चांगल्या सोयी सुविधा मिळतील, अशी आशा नगरसेवकांसह नागरिकांना लागून राहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -