घरमुंबई'या' मुलावर झाल्यात ११ वर्षांत ३० शस्त्रक्रिया

‘या’ मुलावर झाल्यात ११ वर्षांत ३० शस्त्रक्रिया

Subscribe

साकीनाका येथे राहणाऱ्या फरहान अहमद चौधरी या ११ वर्षांच्या लहानग्याला जन्मापासूनच एका अत्यंत दुर्मीळ आजाराने ग्रासले आहे. आजपर्यंत त्याच्यावर एकूण ३० शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत, ज्यापैकी २५ शस्त्रक्रिया या एकट्या कोहिनूर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ संजय हेलाले यांनी केल्या आहेत.

वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी आयुष्यातील तब्बल ३० व्या शस्त्रक्रियेला हसत-खेळत सामोरे जाणारा फरहान सध्या कोहिनूर रुग्णालयात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबईतील साकीनाका येथे राहणाऱ्या फरहान अहमद चौधरी या ११ वर्षांच्या लहानग्याला जन्मापासूनच एका अत्यंत दुर्मीळ आजाराने ग्रासले आहे. आजपर्यंत त्याच्यावर एकूण ३० शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत, ज्यापैकी २५ शस्त्रक्रिया या एकट्या कोहिनूर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ संजय हेलाले यांनी केल्या आहेत. २१ डिसेंबर रोजी कोहिनूर रुग्णालयात त्याच्यावर ३० वी शस्त्रक्रिया पार पडली. भविष्यात आणखी किती शस्त्रक्रिया कराव्या लागतील हे अनिश्चित आहे.

अत्यंत दुर्मीळ आजार

फरहानला ‘ज्युवेनाईल रीकरंट रेस्पिरेटरी पापिलोमेटोडीस’ हा अत्यंत दुर्मीळ आजार असून, तो दहा हजारांत एकालाच होतो. मात्र फरहानला ज्या तीव्रतेने या आजाराचा त्रास होतोय ते पाहता बहुदा जगातील ही पहिलीच केस असावी असा अंदाज वर्तविला जातोय. या आजाराचे स्वरूपच असे आहे की त्याचे ठोस कारण आणि त्यावरचा उपचार अद्याप वैद्यकीय जगताला सापडलेला नाही. या आजारामुळे फरहानच्या श्वसनमार्गात साधारणपणे ३-४ महिन्यांच्या अंतराने पुन्हापुन्हा गाठ तयार होते. आणि गाठ आल्यावर ती काढून टाकणे हा एकच उपाय उरतो. फरहान दीड वर्षांचा असताना डॉ हेलाले यांनी त्याच्यावर पहिली शस्त्रक्रिया केली आणि आजतागायत ते फरहानची प्रत्येक शस्त्रक्रिया करत आहेत.

- Advertisement -

कशी करण्यात येते शस्त्रक्रिया

फरहानवर करावी लागणारी शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक आहे. त्याच्या शरीरातील गाठ श्वसन नलिकेतच असल्याने ३ मिनिटे त्याला कृत्रिम श्वास दिला जातो आणि पुढची ३ मिनिटे शस्त्रक्रिया केली जाते. पुन्हा ३ मिनिटे श्वास, त्यानंतर ३ मिनिटे पुढची शस्त्रक्रिया याप्रकारे एकूण अर्धा ते पाऊण तास एका शस्त्रक्रियेला लागतो. ३-३ मिनिटांच्या ‘ग्रीन विंडो’ काळातच करावी लागणारी ही शस्त्रक्रिया आजवर डॉ हेलाले यांनी फरहानवर तब्बल २५ वेळा केली आहे. यात भूलतज्ज्ञाची भूमिका महत्त्वाची असून डॉ सईदा खान आणि डॉ रत्नाकर गोसावी या कुशल भूलतज्ञांच्या सोबतीमुळेच ही शस्त्रक्रिया उत्तमरित्या पार पाडण्यात कोहिनूरला यश आले आहे.

काय म्हणतात डॉक्टर

“या आजारावर कोणतेही उपचार नसल्याने शस्त्रक्रियेशिवाय इतर पर्याय आमच्यासमोर नाही. फरहानची नैसर्गिक श्वसनप्रक्रिया अबाधित ठेवून ही सर्जरी करणे हे आमचे लक्ष्य आहे. फरहान मोठा होतोय त्यानुसार दोन शस्त्रक्रियांमधील काळ थोडाथोडा वाढतो आहे हे चांगले लक्षण आहे. कदाचित ३० वर्षांचा होईपर्यंत त्याचा हा आजार नष्टही होऊ शकतो. मात्र सध्या तो ११ वर्षांचा असल्याने त्याच्या अतिशय लहान गळ्याच्या भागात ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे खरे आव्हान आहे. कोहिनूरमध्ये आम्ही त्याच्यासाठी वेगळी टीम तयार केली आहे. फरहानच्या शस्त्रक्रियेवेळी केवळ हीच टीम कार्यरत असते, यातील प्रत्येकाला आपली भूमिका चोख माहीत आहे. शिवाय यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणाही इथे उपलब्ध आहे ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे ” असे डॉ संजय हेलाले यांनी मत व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -