घरCORONA UPDATEमुंबईत होणार रुग्णसंख्येचा विस्फोट, १५ मेपर्यंत असतील ६.५ लाख कोरोनाग्रस्त!

मुंबईत होणार रुग्णसंख्येचा विस्फोट, १५ मेपर्यंत असतील ६.५ लाख कोरोनाग्रस्त!

Subscribe

मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून तिथे लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याची बाब वारंवार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्राचं विशेष पथक मुंबईत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दाखल झालं होतं. या पाहणीनंतर पथकानं व्यक्त केलेला अंदाज मुंबईकरांसाठी धक्कादायक असा आहे. येत्या ८ दिवसांत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत मुंबईत तब्बल ४२ हजार ६०४ रुग्ण असतील आणि १५ मेपर्यंत हाच आकडा ६ लाख ५६ हजारांपर्यंत असू शकेल असा अंदाज या पथकाने व्यक्त केला आहे. आत्तापर्यंत मुंबईत ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढतेय, त्या गणिताच्या आधारे हा अंदाज केंद्रीय आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने वर्तवला आहे. याच पद्धतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी १ ते १५ मे या दरम्यान महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत कोरोनाच्या परिस्थितीत स्पाईक अर्थात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढू शकते असा अंदाज वर्तवला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानं व्यक्त केलेले अंदाज मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहेत!

केंद्रीय पथकाचा धक्कादायक इशारा!

हा अंदाज व्यक्त करताना केंद्रीय पथकाने आत्तापर्यंत मुंबईत दिसणाऱ्या ट्रेंडचा आधार घेतला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या इतक्या संख्येने वाढेलच, असं जरी ठामपणे म्हणता येणार नसलं, तरी ती तेवढी वाढण्याची शक्यता मात्र नक्कीच आहे. त्यामुळे ही संख्या वाढली, तर मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेवर त्याचा प्रचंड ताण पडणार आहे. यात ३० एप्रिलपर्यंत वाढू शकणारी रुग्णसंख्या पाहिली, तर ऑक्सिजनची सुविधा नसलेल्या आयसोलेशन बेडची संख्या ३० हजार ४८१ ने कमी असणार आहे, तर १५ मेपर्यंत जी रुग्णसंख्या वाढेल, त्यानुसार अशा आयसोलेशन बेडची संख्या तब्बल ४ लाख ८७ हजार ३३० ने कमी असणार आहे!

- Advertisement -

डॉक्टर, नर्सच्या व्यवस्थेचं काय?

मुंबईमध्ये सध्या ५ हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त असून साधारण २०० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मुंबईतील महापालिकेचे हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटल, हॉटेल, खेळाची मोकळी मैदाने अशा ठिकाणी देखील कोरोना रुग्णांच्या क्वॉरंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ती देखील आता अपुरी पडू लागली आहे. सर्वात धोकादायक बाब म्हणजे ज्या कोरोनाग्रस्तांच्या देखभालीसाठी ज्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांना मात्र, दूरवरच्या ठिकाणाहून प्रवास करून रुग्णालयात यावं लागतं. या प्रवासात त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असू शकते. बातम्यांसाठी फिरणाऱ्या पत्रकारांना देखील अशाच प्रकारे कोरोनाची लागण झल्याच नुकतेच निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था रुग्णालयाजवळच केली, तर त्याचा प्रसार आटोक्यात आणणं शक्य होईल असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

मुंबईत १२ हजार आयसीयू बेडची आवश्यकता

ज्या पद्धतीने आज कोरोनाचा आकडा वाढत आहे, त्यामुळे केंद्रीय पथकाने मुंबईतल्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त केली असून सोमवारी उठवलेल्या लॉकडाऊनबद्दल गंभीर ताशेरे ओढले आहेत. टास्क फोर्समधील डॉक्टरांनी देखील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली असून सुमारे १२ हजार आयसीयू बेडची आवश्यकता लागेल असे आरोग्य विभागाला कळवले आहे.

- Advertisement -

राज्य सरकारसाठी मोठं आव्हान!

मुळात, या भागांची पाहणी करून त्याबाबत राज्य सरकारला मार्गदर्शन करणं, हाच या आरोग्य पथकाचा हेतू होता. त्यामुळे त्यांचा इशारा गांभीर्याने घेण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यानुसार जर रुग्णसंख्या खरंच इतकी वाढली, तर त्या प्रमाणात क्वॉरंटाईन आणि आयसोलेशन बेडची संख्या उपलब्ध ठेवण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -