मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं, ‘उद्धव ठाकरे गट’ असा केला उल्लेख

शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख 'उद्धव ठाकरे गट' असा करत ठाकरेंनाच डिवचले आहे.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवले. यामुळे गेले महिनाभर सुरू असलेले राज्यातील राजकीय नाटय संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पण असे असले तरी दुसरीकडे मात्र शिंदेगट आणि भाजपा यांचा अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षाकडून शिंदेंवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यातच आम्ही शिवसेनेतच आहोत, असा दावा करत ठाकरे कुटुंबीयांवर टीका करणार नाही असा पवित्रा शिंदेंनी घेतला होता. मात्र आता त्याच शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख ‘उद्धव ठाकरे गट’ असा करत ठाकरेंनाच डिवचले आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला विजय मिळाला आहे. या विजयी उमेदवारांचे अभिनंदन मुख्यमंत्री शिंदे यांनी टि्वटमधून केले. मात्र यावेळी त्यांनी एक पोस्टदेखील शेअर केली. यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो छापण्यात आलेत. तसेच, राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निकालाची आकडेवारीही देण्यात आली असून शिंदेंनी भाजपाला ८२, शिवसेना ४०, उद्धव ठाकरे गट २७, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस २२ आणि इतरांना ४७ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिंदेनी शिवसेनेचा उल्लेख उद्धव ठाकरे गट केला आहे. याआधीही उद्धव ठाकरे यांना २७ जुलै रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिंदे यांनी त्यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख न करता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा केला होता. पण या पोस्टमध्ये त्यांनी थेट ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख उद्धव ठाकरे गट केला आहे. यावर ठाकरे कोणती प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शिंदेसह ४० आमदारांनी पक्षविरोधात बंड केले. यामुळे मविआ सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून शिंदेगट आणि शिवसेनेतील नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बंडखोरांकडून सातत्याने शिवसेनेच्या डबघाईसाठी उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदेगटावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर शिंदेनी शिवसेनेचा उल्लेख उद्धव ठाकरे गट केल्याचे बोलले जात आहे.