घरमुंबईकोरोनाचा मौखिक आरोग्यावरही परिणाम

कोरोनाचा मौखिक आरोग्यावरही परिणाम

Subscribe

सायन रुग्णालयातील डेंटल विभागाचे संशोधन

कोरोनाबाधित रुग्णांना शारीरिक आजाराबरोबर मानसिक आजारालाही सामोरे जावे लागत आहे. त्यात आता तोंडाच्या विविध आजारांचाही समावेश झाला आहे. कोरोनाबाधित किंवा कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या तोंडामध्ये विविध प्रकारचे अल्सर, तोंडाची आग होणे, टॉन्सिल्स, तोंडातील कोपर्‍यांमध्ये जळजळ होणे, जीभ कोरडी पडणे, हिरड्यांना सूज येणे याचबरोबर तोंडाचे विविध संसर्ग होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक सर्वसामान्य रुग्णालयातील डेंटल विभागाने हे संशोधन केले आहे.

कोरोनाबाधित रुग्ण तोंडाच्या विविध आजाराने त्रस्त असल्याच्या काही तक्रारी सायन रुग्णालयातील डेंटल विभागाच्या डॉक्टरांकडे आल्या. त्यांनी यासंदर्भात कोरोनाबाधित रुग्णांच्या तोंडामध्ये आणि घशाखालील भागाचे निरीक्षण केले. त्यासाठी त्यांनी रुग्णांचे कोराड स्कोर, सीटी-स्कॅन स्कोर, ब्लड मार्कर लेव्हल, ऑक्सिजनची गरज, रुग्णांवर करण्यात येणारे औषधोपचार आणि त्यांना असलेल्या अन्य आजारांचे निरीक्षण केले. संशोधनात डॉक्टरांनी कोविड 19 ची तीव्रता आणि तोंडातील आजारांची लक्षणे तसेच औषधांचा तोंडामध्ये होणारा परिणाम याचा अभ्यास केला. सायन रुग्णालयाच्या डेंटल विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत धुसिया, डॉ. हेरा हवेवाला, डॉ. विशाल देवळवार आणि डॉ. सुरूपा दास यांनी कोरोनाबाधित रुग्णांना होत असलेल्या तोंडाच्या आजारांवर संशोधन केले. कोरोनाबाधित रुग्ण तोंडाच्या आजाराने त्रस्त होत असल्याचे सिद्ध करण्यासाठी डॉक्टरांच्या तुकडीने 101 रुग्णांच्या तोंडामध्ये आजारांचा अभ्यास केला.

- Advertisement -

यामध्ये 39 रुग्णांमध्ये प्राथमिक तपासणीमध्ये तोंडाचे आजार असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये विविध प्रकारच्या अल्सरने रुग्ण त्रस्त असल्याचे दिसून आले. त्यातही रुग्णांना अफथॉस अल्सरचा त्रास अधिक होत होता. हरपेटिक आणि अफथॉस अल्सर हे प्रामुख्याने संसर्गाने येणारा मानसिक तणाव, विलगीकरण आणि रोगचिकित्सा यातून होतो. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर रुग्णांमध्ये वाढणार्‍या मानसिक तणावाचा परिणाम त्यांच्या तोंडातील अल्सरचे प्रमाण वाढण्यामध्ये होत असल्याचे संशोधनात दिसून आले. कोरोना झालेल्या रुग्णांना देण्यात येणार्‍या औषधांचे प्रमाण आणि विलगीकरणामुळे येणारे मानसिक तणाव हे कोरोना रुग्णांचे तोंडातील आजार बळावण्यासाठी अधिक कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे.

त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांच्या तोंडामध्ये जळजळ आणि महत्वाचे म्हणजे टॉन्सिल्स, तोंडातील कोपर्‍यांमध्ये जळजळ, संसर्ग, जीभ कोरडी पडणे, हिराड्यांना सूज येणे ही लक्षणेही मोठ्या प्रमाणात दिसून आली. यामध्ये काही रुग्णांना रिटोनावीर आणि फेविपीरावीर या औषधांची अ‍ॅलर्जी झाल्याचे दिसून आले. सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या या संशोधनातून आता कोरोना रुग्णांना आणखी एका समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशोधनातून आलेला निष्कर्ष लक्षात घेता सायन रुग्णालयातील डेंटल विभागाच्या डॉक्टरांच्या तुकडीने यावर अधिक व्यापक स्वरुपात संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये मोठ्या रुग्णसंख्येचा अभ्यास करून ही लक्षणे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात येणार असल्याचे डेंटल विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत धुसिया यांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोनाचा तोंडांच्या आजारावर होत असलेल्या परिणामासंदर्भात अशाप्रकारे देशामध्ये प्रथमच संशोधन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव नाकाद्वारे होत असल्याने तोंडामध्ये त्याचे परिणाम वाढत आहेत. त्यामुळे तोंडातील आजारांवर वेळेवर उपचार न केल्यास रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो. या संशोधनाने कोरोनाच्या उपचारांना वेगळी दिशा मिळण्याच्या शक्यता आहे.
– डॉ. हेमंत धुसिया, विभाग प्रमुख, दंत वैद्यकीय विभाग, सायन रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -