होळी खेळून घरी आलेल्या दाम्पत्याचा झाला मृत्यू; मुंबईतील धक्कादायक घटना

होळी खेळून घरी आलेल्या दाम्पत्याचा त्यांच्या घरातील बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील घाटकोपर येथे घटना घडली असून या दाम्पत्याचा मृत्यू कसा झाला? हे अद्यापही कळू शकलेले नाही.

couple who came home after playing Holi died; Shocking incident in Mumbai

मुंबईतील घाटकोपरमध्ये असलेल्या पंतनगर येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याचा होळी खेळून घरी आल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. दीपक शहा (वय वर्ष ४४) आणि टिना शहा (वय वर्ष ३९) असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. दीपक शहा हे कपड्यांचे व्यायवसायिक असून ते घाटकोपर येथील पंतनगरमध्ये असलेल्या कुकरेजा पॅलेसमध्ये राहण्यास होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी अनेक ठिकाणी होळी साजरी करण्यात अली. त्यानुसार शहा दाम्पत्याने देखील आपल्या शेजाऱ्यांसह आणि कुटुंबियांसह होळी साजरी केली. त्यानंतर ते पुन्हा आपल्या घरी आले. यानंतर शहा यांच्या कुटुंबीयांनी दुपारच्या सुमारास त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु शहा दाम्पत्याकडून काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. यामुळे शहा यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे घर गाठले आणि दुसऱ्या चावीच्या साहाय्याने दरवाजा उघडला.

शहा यांच्या घराचे दार उघडल्यानंतर या पती-पत्नीचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना घराच्या बाथरूमध्ये सापडल्याने त्यांना एकच धक्का बसला. या घटनेची माहिती तात्काळ पंतनगर पोलिसांना देण्यात आली. पंतनगर पोलिसांकडून तात्काळ घटनास्थळी धाव घेत दीपक शहा आणि टिना शहा यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु याठिकाणी डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

हेही वाचा – बदलापुरात तडीपार गुंडाचा हातात तलवार घेऊन धिंगाणा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दरम्यान, शहा दाम्पत्य हे कुकरेजा पॅलेस इमारतीत दोघेच राहत होते. होळी खेळून घरी गेल्यानंतर अंघोळ करताना या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा मारहाणीच्या खुणा देखील आढळून आलेल्या नाहीत. या दोघांचा मृत्यू हा बाथरूममध्ये असलेल्या गीजर गॅसच्या गळतीमुळे बाथरूममध्ये कोंडून झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, या घटनेमुळे शहा यांच्या नातेवाईकांना आणि शेजारच्यांना धक्का बसला आहे. कारण त्या सर्वांनी एकत्र होळी साजरी केल्यानंतर काहीच वेळात अशी घटना घडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.