यूपीएसीमध्ये मुलींच्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांना टोला, आता त्यांनाही देताल का सल्ला…

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत मुलींनी यश मिळवले आहे. पहिल्या चार क्रमांकावर मुली आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे.

UPSC परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्या चारही क्रमांकांच्या मानकरी महिलाच आहेत. अष्टावधानी स्त्री कुठल्याच क्षेत्रात कुणापेक्षाही कमी नाही, हेच यातून पुन्हा अधोरेखित होतंय. लखलखते यश मिळवलेल्या स्त्री शक्तीला सलाम. यशस्वी उमेदवारांचं अभिनंदन!, असे ट्विट प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले आहे. या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना त्यांच्या सुप्रिया सुळे यांच्यावरील वक्तव्यावरून टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळे यांना घरी जा आणि स्वयंपाक करा असे म्हणाले होते.

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या निकालामध्ये यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिले चार क्रमांक पटकावत मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. चंद्रकांतदादा, आता त्यांनाही ‘घरी जा, स्वयंपाक करा’ असा सल्ला द्याल का?, असा प्रश्न विचारत त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.