घरमुंबईडहाणूतील भूकंपामुळे सरकारला ‘धक्के’

डहाणूतील भूकंपामुळे सरकारला ‘धक्के’

Subscribe

जीवित, वित्त हानी रोखण्यासाठी लवकरच उपायोजना

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे वारंवार बसणार्‍या भूकंपाच्या धक्क्याची नेमकी कारणे आणि अभ्यास आता नॅशनल जिऑग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट, हैद्राबाद आणि आयआयटी मुंबईकडून यांच्याकडून करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात जाणवणार्‍या भूकंपाच्या धक्क्यांपासून होणारी जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी आज विधानपरिषदेत दिली. विधान परिषदेचे सदस्य आनंद ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना भेगडे यांनी ही माहिती दिली.

लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत विद्यार्थी हे विविध ठिकाणी कॅम्पमध्ये येऊन राहिले होते. पण आता पावसाळा सुरू झाल्याने या मुलांना कॅम्पमध्ये कसे ठेवायचे, असा सवाल पालक करत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर अनेक पालकांनी आपल्या मुलांना कॅम्पमधून नेण्याची सुरूवात केली असल्याचेही ते म्हणाले. येत्या दिवसांमध्ये याठिकाणी अनेक धरणांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. तसेच नजीकचा अणुऊर्जा प्रकल्प पाहता याठिकाणी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याची चिंता आनंद ठाकूर यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

आयआयटी मुंबईला आतापर्यंत २० लाख रूपयांचा निधी राज्य सरकारकडून या संपूर्ण भूकंपाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. तर नॅशनल जिऑग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट, हैद्राबाद यांची टीम डहाणू तालुक्यात २० जानेवारीपासून कार्यरत आहे. भूकंप मापक यंत्रातून माहिती घेऊन ही माहिती संस्थेला कळविण्यात येत असल्याचे भेगडे यांनी सांगितले. डहाणू व तलासरी तालुक्यात आतापर्यंत ९ ठिकाणी भूकंप मापक यंत्रे बसविण्यात आली आहेत.

नागरिकांना आपत्कालीन प्रशिक्षण आणि जनजागृती
पालघर जिल्ह्यात बसणार्‍या भूकंपाच्या धक्क्यांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच स्थानिक जनतेच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या भितीचे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून शालेय स्तरावरुन गावागावातील नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी एनडीआरएफ, सिव्हील डिफेन्समार्फत प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात जाणवणार्‍या भूकंपाच्या धक्क्यांंच्या अनुषंगाने शासन जनजागृती व प्रशिक्षणाबाबत अग्रक्रमाने कार्यवाही करत आहे. तसेच जिल्ह्यातील अणुऊर्जा प्रकल्पाला भूकंपरोधक बांधकाम केले असल्याची माहिती भेगडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -