घरमुंबईभिवंडी शहरात डेंग्यु, मलेरीयाने हाहाःकार!

भिवंडी शहरात डेंग्यु, मलेरीयाने हाहाःकार!

Subscribe

भिवंडी शहरात डेंग्यू, मलेरीयाने हाहाःकार केला असून मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या रुग्णांनी १०० चा आकडा पार केला आहे. तर मलेरीयाने हजारो रूग्णांना वेढले आहे. तर यामधील काही रुग्ण दगावले असल्याचे समजते.

गेल्या काही दिवसांपासून भिवंडी शहरात टायफॉइड, मलेरिया आणि डेंग्यूच्या तापाने उच्छाद मांडला आहे. शासकीय आणि खाजगी रूग्णालयात कित्येक रुग्ण तापाने फणफणले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांनी १०० चा आकडा पार केला आहे. तर मलेरीयाने हजारो रूग्णांना वेढले आहे. तर यामधील काही रुग्ण दगावले असल्याचे समजते. मात्र, पालिकेचा आरोग्य विभाग झोपा काढत आहे. पालिकेने प्रशिक्षित असलेली MPW ची टिम जाणीवपूर्वक दुसऱ्या आरोग्य विभागाकडे वळवली आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.

भिवंडी शहरातील नागरीक विविध आजारांनी त्रस्त आहेत. त्यातच टायफॉईड, मलेरिया आणि डेंग्यू ने डोके वर काढले असून संपूर्ण शहरच तापाने फणफणले आहे. भिवंडी पालिकेची शहरात १५ आरोग्य केंद्रे आहेत. सदर आरोग्य केंद्रात गेल्या अनेक वर्षापासून मलेरिया आणि विविध साथींच्या रोगापासून नागरिकांनी कसा बचाव करावा? याची संपूर्ण माहिती देण्यासाठी प्रशिक्षित MPW कर्मचारी कार्यरत होते. हे कर्मचारी प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना स्वच्छता आणि रोगांपासून बचावाचे धडे देत होते. ज्यांना रोगाने वेढले आहे किंवा ताप आला आहे, अशा रुग्णांचे रक्त तपासण्याचे काम हे कर्मचारी करीत असत.

प्रशासन ढिम्म, सार्वजनिक आरोग्य धोक्यात!

काही कारणास्तव नियमांच्या चौकटीच्या आधारे तात्कालीन आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी गेल्यावर्षी या टिमचे काम बंद केले होते. मात्र, या कर्मचाऱ्यांची शहराला आवश्यकता वाटल्याने शिवसेनेचे गटनेते संजय म्हात्रे यांनी लेखी पत्र दिल्याने आरोग्याच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी पुन्हा या MPW च्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती गेल्या महिन्यात १५ आरोग्य केंद्रात केली. मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि श्रेयाचे राजकारण आडवे आल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असतानाही MPW कर्मचाऱ्यांची नियुक्त पाच दिवसातच रद्द करण्यात आली. प्रशिक्षित कर्मचारी असतानाही त्यांच्याकडून काम करुन घ्यायचे सोडून त्यांना फुकटचा पगार देण्याची धन्यता पालिका मानत आहे.

विशेष म्हणजे सार्वजनिक आरोग्यच धोक्यात आले असूनही राजकारण आडवे आणून नागरिकांच्या जिवाशी खेळले जात आहे. शहरात साथीच्या रोगांचा फैलाव सुरू झाला असून, शहरातील शासकीय आणि खाजगी रूग्णालयात तापाने रुग्ण फणफणले असतानाही त्याची कुठेच वाच्यता होऊ नये याचेच आश्चर्य वाटत आहे. पालिका प्रशासन नागरिकांना रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत गरजा पुरवण्यात अपयशी ठरली असून आता त्यांच्या आरोग्याशीही खेळले जात आहे. यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास साथीच्या रोगांनी संपूर्ण शहर वेढले जाणार आहे. याबाबत नागरीकही मूग गिळून गप्प असून कोणीही आवाज उठवायला तयार नाही. सर्वांच्याच संवेदना हरवल्या आहेत का? असा प्रश्न आता पडत आहे. एकूणच भिवंडी शहराचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून आयुक्तांनी यामध्ये जातीने लक्ष घालून तात्काळ उपाययोजना करणे आत्यावश्यक आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी महापालिका युनियनचे अध्यक्ष महेंद्र कुंभारे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -