घरमुंबईडॉक्टर्स आणि निम वैद्यकीय कर्मचार्‍यांअभावी कोविड केअर हेल्थ सेंटर सुरु करण्यात अडचणी

डॉक्टर्स आणि निम वैद्यकीय कर्मचार्‍यांअभावी कोविड केअर हेल्थ सेंटर सुरु करण्यात अडचणी

Subscribe

कोरोना कोविड १९च्या बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केअर हेल्थ सेंटर तयार करण्यात येत आहे. एमएमआरडी मैदान, नेस्को, रेसकोर्ससह अन्य ठिकाणी कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी सेंटर उभारण्यात येत असले तरी प्रत्यक्षात डॉक्टर्स,नर्सेस तसेच इतर निम वैद्यकीय कर्मचार्‍यांअभावी वेळीच सुरु करण्यात अडचणी येत आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर एमएमआरडीएने उभारलेले सेंटर केवळ डॉक्टर्स व निम वैद्यकीय कर्मचार्‍यांअभावी सुरु करण्यात अडचणी येत असल्याची बाब समोर येत आहे.

मुंबई महापालिकेने वरळी डोम एनएससीआय,नेस्को, वांद्रे-कुला संकुल मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स, रिचडसन अँड क्रुडास आदींसह अनेक ठिकाणी बाधित रुग्णांवर मध्यम स्वरुपाच्या उपचारासाठी कोविड केअर हेल्थ सेंटर उभारण्यात आले आहे. एमएमआरडीएच्या वतीने ८०० खाटांचे ऑक्सिजनसह व्यवस्था करण्यात येत आहे. यातील १०० खाटांचे कक्ष पहिल्या टप्प्यात २५ मे रोजी सुरु करण्यात आला आहे. परंतु पहिल्या दिवशी केवळ ३५ रुग्णांनाच दाखल करण्यात आले आहे. सध्या येथे १३ डॉक्टर, ८ परिचारिका, १४ वॉर्ड बॉय नेमण्यात आले आहेत. तर इतर कामकाजासाठी ७ लिपीक नेमले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी अजुनही मनुष्यबळाची कमरता या केंद्राला जाणवत आहे. याशिवाय अन्य हेल्थ सेंटर आणि रुग्णालयातही हीच परिस्थिती आहे.

- Advertisement -

कुपर रुग्णालयातच जाणवू लागली कमतरता

कुपर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसह निम वैद्यकीय कर्मचार्‍यांना जोगेश्वरी ट्रामा केअर सेंटर आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात नियुक्त करण्यात आले आहे. परंतु आता कुपर रुग्णालयावर भार आता अधिक वाढू लागला असून त्यामुळे कर्मचार्‍यांची कमतरता दिसून येत आहे. परिणामी याचा परिणाम आरोग्य तथा वैद्यकीय सेवेवर होत असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

शिकाऊ डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत घ्या

केईएम,शीव, नायर आणि कुपर अर्थात बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आदी चार ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय असतानाही सध्या महापालिकेला डॉक्टर्स तसेच नर्सेसची कमतरता दिसून येत आहे. मात्र अनेक शिकाऊ डॉक्टर्स तसेच नर्सेस कोरेानाच्या काळात गावी गेल्यामुळे त्यांची मदत घेता येत नाही. दुसर्‍या किंवा तिसर्‍या वर्षातील शिकाऊ नर्सेसची मदत घेण्याची तयारी महापालिकेने दर्शवली असून त्यानुसार त्यांना सुचनाही करण्यात आल्या आहे. त्याचप्रमाणे तिसर्‍या व चौथ्या वर्षातील शिकाऊ डॉक्टरांची सेवाही आता घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेच्या माजी आरोग्य समिती अध्यक्ष व विद्यमान सदस्य राजुल पटेल यांनी काही शिकाऊ डॉक्टर्स व नर्सेसची मदत घेण्याची हीच वेळ असल्याचे सांगितले. जर हे विद्यार्थी गावी गेले असतील तर महापालिकेने त्यांना पत्र पाठवून त्वरीत महाविद्यालयात हजर होण्याचे निर्देश देण्याची गरज आहे. या शिकाऊ विद्यार्थी व नर्सेसची मदत कोविड केअर हेल्थ सेंटरमध्ये घेतली जावू शकते. जेणेकरून सर्व हेल्थ सेंटर योग्यप्रकारे सुरु होतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -