घरमुंबईठाण्यात डिजेचा आवाज मोठ्ठाच...!

ठाण्यात डिजेचा आवाज मोठ्ठाच…!

Subscribe

उच्च न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवू नये, असे स्पष्ट केले होते. तरीही हिंदूंच्याच सणाला निर्बंध का असा सवाल करत काही राजकीय पक्षांनी ठाण्यात डीजेचा दणदणाट होणार, कोणाला काय करायचे ते करा, असा अघोषित फतवा काढला होता.

ठाणे : ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडणार्‍या डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे अशक्य आहे, या राज्यसरकारच्या भुमिकेचे मुंबई हायकोर्टानेही समर्थन केले आहे. लाइव्ह कॉन्सर्ट आणि इनडोअर कार्यक्रमांमध्ये डीजे व डॉल्बीला परवानगी दिली जाते. मग सार्वजनिक ठिकाणीच बंदी का, असा प्रश्न उपस्थित करून गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेला परवानगी मिळावी असा डीजे आणि डॉल्बीवाल्यांचा प्रयत्न होता, मात्र हायकोर्टाने तूर्तास डीजे आणि डॉल्बीला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. तरीही ठाण्यात विविध ठिकाणी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देताना डिजेचा दणदणाट झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते डॉ.महेश बेडेकर यांनी केला आहे.

उच्च न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवू नये, असे स्पष्ट केले होते. तरीही हिंदूंच्याच सणाला निर्बंध का असा सवाल करत काही राजकीय पक्षांनी ठाण्यात डीजेचा दणदणाट होणार, कोणाला काय करायचे ते करा, असा अघोषित फतवा काढला होता. त्याला प्रतिसाद देत अनेक सार्वजनिक मंडळांनी पाच दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट केला. रात्री 10 नंतर डीजे, विविध वाद्ये वाजवण्यास बंदी असतानाही काही मंडळांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वर्तकनगर, शास्त्री नगर, पाचपाखाडी, राम मारुती रोड, गोखले रोड, मल्हार सिनेमा आदी ठिकाणी त्या विरोधातही अजून गुन्हे दाखल झालेले नाहीत. जबाबदार मंडळांवर कारवाई करून ध्वनी प्रदूषणाला आळा घालावा, अशी मागणी ठाणेकर करत आहेत.

- Advertisement -

देशात सण-उत्सव साजरे करण्यासाठी वर्षाला 15 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ढोलताशा वाजवण्यास मुभा देण्यात आली आहे. रात्री दहा ते सकाळी सहाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे ध्वनिप्रदूषण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. दिवसा 55 आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा निवासी क्षेत्राकरीता तर औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 आणि रात्री 70, व्यापारी क्षेत्रात दिवसा 65 आणि रात्री 55 तर शांतता क्षेत्रात दिवसा 50 आणि रात्री 40 डेसिबल आवाजाची तीव्रता ठेवणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग केल्यास मंडळाच्या अध्यक्षांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. हा अपराध सिद्ध झाला तर किमान पाच वर्षे कैद आणि एक लाखांचा दंड, तर हाच अपराध पुन्हा केला तर सात वर्षे कैद आणि दोन लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

पाच दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेसोबत ढोलताशा, अ‍ॅम्प्लिफायर आदी वाद्यांचा कर्कश आवाज होता. तसेच शहरातील 10 ठिकाणच्या ध्वनीची पातळी तपासली असता अनेक ठिकाणी आवाजाची पातळी ही 100 डेसीबलपर्यंत गेल्याचे दिसून आले आहे.  -डॉ.महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisement -

गणेशोत्सवामधील ध्वनीप्रदूषण करणार्‍या मंडळांची नोंदणी केली जात असून गणेश विसर्जन झाल्यानंतर त्या मंडळांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.  -एस.पी.गायकवाड, विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -