कपिल पाटील यांच्या मदतीला आले डोंबिवलीचे नगरसेवक

Bhiwandi MP Kapil Patil
भिवंडी खासदार कपिल पाटील

भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा प्रचार करण्यास कल्याणातील शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे कल्याणात प्रचार करण्यासाठी भाजप डोंबिवलीतील ३८ नगरसेवकांची टीम उतरविणार आहे. शिवसेनेच्या वॉर्डात भाजपचे नगरसेवक प्रचार करणार असून, तसा कार्यक्रमही भाजपने आखला आहे. यामुळे डोंबिवलीत शिवसेनेच्या उमेदवाराचा  प्रचार करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकाची  टीम नसणार आहे.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ हा भिवंडी लोकसभेत येतो. कल्याणातील खासदार पाटील यांच्या विषयी नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपचा प्रचार करण्यास नकार दर्शविला आहे. कल्याण विधानसभेत भाजपचा आमदार निवडून आला आहे. या मतदार संघावर शिवसेनेने दावा करीत, हा मतदार संघ शिवसेनेला सेाडला तरच भाजपचे पाटील यांचा प्रचार करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. कल्याण भाजपची टीम ही पाटील यांचा प्रचार करीत आहे मात्र शिवसेनेच्या आडमुठे भूमिकेमुळे भाजपने कल्याणच्या बरोबरच डोंबिवलीची टीम उतरवली आहे.

डोंबिवलीत भाजपचे एकूण ३८ नगरसेवक आहेत. प्रत्येक नगरसेवकाला शिवसेनेच्या वॉर्डात प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या वॉर्डातत्यांनी प्रचार न केल्यास त्या ठिकाणी भाजपचे नगरसेवक प्रचार करणार आहेत. भाजपने तातडीने हा कार्यक्रम आखला आहे. डोंबिवली हा कल्याण लोकसभा मतदार संघात यतो. डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो. कल्याण लोकसभेतून युतीचे डॉ श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत. शिंदे यांना भाजपची मदत लागणार आहे.मात्र भाजपचे नगरसेवकांनी कल्याणता प्रचारासाठी जुंपण्यात येणार असल्याने डोंबिवलीत शिवसेनेचा प्रचार करण्यास भाजपचे नगरसेवक नसणार आहेत. त्यामुळे डोंबिवलीत शिवसेनेच्या प्रचारावर फरक पडू शकतो. शिवसेना भाजपच्या असहकार्याचा फटका दोन्ही उमेदवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.