घरमुंबईमानखुर्द येथे भीषण आग

मानखुर्द येथे भीषण आग

Subscribe

# महापौरांची आगीच्या ठिकाणी भेट, # भूमाफिया, बेकायदा ऑईल साठ्यामुळे दुर्घटना झाल्याचा आरोप, # केमिकल, ऑईलने भरलेले सुमारे ५०० ते ६०० कॅन जळाले

मानखुर्द -घाटकोपर लिंक रोड, मानखुर्द मंडाला, अण्णा भाऊ साठे नगर, येथील कुर्ला भंगार गोदामाला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. केमिकल, ऑईलने भरलेले सुमारे ५०० ते ६०० मोठे कॅन जळाल्याने आगीचा प्रचंड भडका उडाला. या आगीमुळे अंदाजे ५० भंगारांची गोदामे जळून खाक झाली. त्यामुळे मोठी वित्तीय हानी झाली. तसेच, आग विझविताना अग्निशमन दलाचे कर्मचारी हरीश नाडकर (४०) हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही आग स्तर -३, ची असल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले आहे. ही आग विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी, घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी यांच्या जागेत भूमाफियांनी अतिक्रमण केले असून बेकायदेशीरपणे ऑईलचा साठा करण्याचा प्रकार यातून ही आगीची दुर्घटना घडल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. यापुढे भूमाफियांचा कायमचा बंदोबस्त कायदेशीर मार्गाने करण्यात येईल, असे महापौरांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या आगीची भीषणता एवढी होती की, दूर अंतरावरून आगीचा काळाकुट्ट धूर दिसत होता. आगीची घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी तेथील तरुण मुले आगीचे चित्रीकरण मोबाईलद्वारे करण्यात गर्क असल्याचे या आगीबाबतच्या सोशल मीडियावरील व्हिडिओवरून दिसून येते. मात्र आगीची तक्रार प्राप्त होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम तातडीने हाती घेतले. १३ फायर इंजिन, ११ जम्बो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -