‘अशा कारवायांना शिवसेना कधी घाबरली नाही आणि कधी घाबरणार नाही’ – एकनाथ शिंदे

महाविकास आघाडी सरकार कधीही अस्थिर होणार नाही. हे सरकार बहुमताचे सरकार आहे. त्यामुळे सरकार पडेल असा कोणीही विचार करू नका. सरकार सरकारचे काम करत आले आहे आणि पुढेही करत राहील.

Eknath Shinde

“अशा कारवायांना शिवसेना कधी घाबरली नाही आणि कधी घाबरणार नाही”, असा इशारा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी भाजपला दिला आहे. ठाण्यात आज ईडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांवर मोठी कारवाई करण्यात आली. (rashmi thackeray brother shridhar patankar ED Action)  श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर आज झालेल्या ईडी कारवाईनंतर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (Eknath Shinde Reaction on rashmi thackeray brother shridhar patankar ED Action)

श्रीधर पाटणकरांच्या ईडी कारवाईवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, गैरकामांची चौकशी नक्की करावी, परंतु सुड बुद्धीने, आकसापोटी, राजकीय सुडाच्या भावनेने अशा प्रकारची कारवाई लोकशाहीत करणे योग्य नाही. अशा कारवायांना सेना कधीही घाबरली नाही आणि कधीही घाबरणार नाही. महाविकास आघाडी सरकार कधीही अस्थिर होणार नाही. हे सरकार बहुमताचे सरकार आहे. त्यामुळे सरकार पडेल असा कोणीही विचार करू नका. सरकार सरकारचे काम करत आले आहे आणि पुढेही करत राहील.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ईडीच्या कारवाया आपण पाहत आलो आहोत. या सगळ्या कारवाया सूड बुद्धीने केल्या जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा चूकीचा वापर लोकशाहीसाठी घातक आहे. केवळ महाविकास आघाडी सरकार काम करत असताना त्याला अस्थिर करण्याचे काम सरकार स्थापन झाल्यापासून करण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. लोकशाहीत बहुमताच्या आकड्याला फार महत्त्व असते. त्यामुळे सरकारवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. अशा कारवायांना शिवसेना कधीही घाबरणार नाही. सरकार काम करत राहिल आणि योग्य वेळी उत्तर देईल.

महाविकास आघाडी सरकार योग्य वेळी उत्तर देणार. शिवसेना अशा कारवायांना कधीही घाबरणार नाही. शिवसेना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी लोकांच्या, राज्याच्या, देशाच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहे आणि हे काम असेच सुरू राहिल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


हेही वाचा – रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांच्या 11 सदनिका जप्त, ईडीची मोठी कारवाई