घरमुंबईफुललेले कमळ हा उदरनिर्वाहाचा आधार

फुललेले कमळ हा उदरनिर्वाहाचा आधार

Subscribe

नवरात्र उत्सवात फुलांच्या विक्रीतून आदिवासींना रोजगार

फुले घ्या फुले कमळाची फुले … घ्या देवीसाठी फुले … अशी आरोळी सध्या रोज शहापूरकरांच्या कानी पडत आहे. शहापूर शहरातील बाजारपेठेत असलेल्या अंबिका मातेच्या मंदिरालगत नवरात्रोत्सव काळात येथील आदिवासी महिला दरवर्षी कमळाची फुले विकतात. या फुलांच्या विक्रीतून त्यांना रोजगार मिळतो आहे.

फुलांच्या विक्रीतून रोज 100 ते 150 रुपयांची कमाई होत असते. हे पैसे आमच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी उपयोगी पडत असल्याचे आदिवासी महिला मंगला वाघ यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील दाट जंगल असलेल्या तानसा अभयारण्यात अनेक आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी मोल मजुरीबरोबर कंदमुळे विकणे जंगलातील रानभाज्या विकणे, मासेमारी करणे असे विविध व्यवसाय हे आदिवासी करतात.

- Advertisement -

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या काळातही पुजाविधीसाठी लागणारी फुले विक्रीचा व्यवसाय येथील आदिवासी दरवर्षी करतात. नवरात्रोत्सवाच्या 9 दिवस देवीला वाहण्यासाठी कमळाची फुले लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर कमळाच्या फुलांना आता मागणी असते. या कमळाची फुले मिळविण्यासाठी आदिवासी महिलांना पहाटे 5 वाजता उठावे लागते. तानसा तलावाच्या काठावरील पाण्यात चिखलात बहरलेली ही फुले मोठ्या मेहनतीने काढून एका टोपलीत भरून विक्रीसाठी शहापूर शहारात आणतात. सध्या खास नवरात्रोत्सव सणात कमळाच्या फुलांना विशेष अशी मागणी आहे. कमळाच्या फुलांना मागणी वाढल्याने 10 रुपयांस एक फूल अशी ग्राहकास विक्री केली जात आहे.

फुलांच्या विक्रीतून रोज 100 ते 150 रुपयांची कमाई होत असल्याचे फुलांची विक्री करणार्‍या रंजना पादीर या आदिवासी महिलेने सांगितले. एकंदरीतच नवरात्रोत्सवाच्या 9 दिवस फुलांच्या विक्रीतून या गरीब आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कमळाच्या फुलांची विक्री करण्यासाठी शहापुरातील अंबिका मातेच्या मंदिरालगत ठिकठिकाणी आदिवासी महिला रांगेत बसल्याचे नजरेस पडत आहेत. त्यांच्या जवळील टोपलीत भरलेली पांढर्‍या रंगाची कमळांची फुले सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -