Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईत ‘निर्भया’ पथकांची स्थापना

महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईत ‘निर्भया’ पथकांची स्थापना

पीडित महिलांसाठी राबवणार ‘सक्षम’ उपक्रम

Related Story

- Advertisement -

साकीनाका येथील प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी महिला, तरुणी आणि बालकांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्ह्यातील पीडित महिला, अल्पवयीन मुले, मुली यांना मानसिकदृष्ठ्या सशक्त करण्यासाठी आणि विधीसंघर्ष बालकांचे समुपदेशन, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ‘एम पॉवर’ या सामाजिक संस्थेच्या सहभागातून ‘सक्षम’ हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे मुंबई पोलीस आयुक्तांकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

साकीनाका येथे ३० वर्षीय महिलेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर मुंबईत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साकीनाका घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून राज्यभरात महिलांच्या सुरक्षितेसाठी काय उपाय योजना करता येतील याबाबत मुख्यमंत्र्यांनी सोमवारी गृहमंत्री, मुख्य सचिव, गृहविभागाचे अतिरिक्त सचिव तसेच राज्यातील पोलीस यंत्रणा यांची बैठक घेऊन यावर चर्चा करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेला घेऊन या उपयायोजना लवकरात लवकर कार्यान्वित कराव्या याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सोमवारी पार पडलेल्या बैठकीत दिल्या आहेत.

- Advertisement -

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याबाबत ताबडतोब पावले उचलत मुंबई पोलिसांचे निर्भया पथक तसेच ‘एम पॉवर’ या सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून ‘सक्षम’ हा उपक्रम राबवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. याबाबत मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक परिपत्रक काढले असून या परिपत्रकात महिलांच्या सुरक्षितेबाबत निर्भया पथके स्थापन करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

समाजामध्ये महिलांविषयी आदरयुक्त भावना निर्माण करणे व कायद्याची भीती निर्माण करणे या उद्देशाने तसेच महिलांवर होणार्‍या अत्याचार, छेडछाडीचे समूळ उच्चाटन होण्यासाठी ‘निर्भया’ पथकाची स्थापना करण्यात येत असल्याचे नगराळे यांनी परिपत्रकात म्हटले आहे. तसेच मुंबई पोलीस दलामार्फत ‘एम पॉवर’ या संस्थेच्या सहभागातून ‘सक्षम’ हा उपक्रम महिलांविरुध्द गुन्ह्यातील पीडित महिला, पोस्को कायद्यांतर्गत गुन्ह्यातील बालक, पीडित, अल्पवयीन मुले, मुली यांना मानसिकदृष्ठ्या सशक्त करण्याकरिता तसेच विधीसंघर्षग्रस्त बालके यांना योग्य मार्गदर्शन, गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी मानोसपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्याकरिता राबविण्यात येणार असल्याचे नगराळे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हे निर्भया पथक प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यन्वित असेल, या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे दोन महिला अधिकारी तसेच १ महिला आणि १ पुरुष अंमलदार आणि चालक असे हे निर्भया पथक असेल. प्रत्येक पोलीस ठाण्यातील निर्भया पथकातील गस्त मोबाईल व्हॅन-५ अशी निर्भया पथकाची ओळख असेल. प्रादेशिक विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या महिला अधिकारी नोडल/ आणि पर्यवेक्षक अधिकारी म्हणून काम पाहतील. त्याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाण्यात वुमन सेफ्टी सेल स्थापन केले जातील. महिलांसाठी १०३ हा हेल्पलाईन क्रमांक असेल. या क्रमांकावर कॉल येताच निर्भया पथक त्या ठिकाणी दाखल होईल.

रेकॉर्डवरील गुन्हेगार याची यादी तयार करणे, प्रत्येक महाविद्यालये, शाळा या ठिकाणी ’निर्भया पेटी’ लावण्यात येणार असून त्यात महिला आणि तरुणी आपल्या समस्या लिहून निर्भया पेटीत टाकतील. निर्भया पथक हे पेट्या उघडून त्यातील समस्यांचे निरसन करतील, तसेच गस्तीच्या वेळी या तक्रारपेटीतील तक्रारीची वेळीच पोलिसांना दाखल घ्यावी लागणार असल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -