घरमुंबईमंत्रालयावर धडकणार शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा!

मंत्रालयावर धडकणार शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा!

Subscribe

शेतकऱ्यांनी न्यायासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला आहे. हा मोर्चा इतर मोर्चांपेक्षा वेगळा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये शेतकरी अर्धनग्न आहेत. सोमवारी शेतकऱ्यांचा हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. 'मंत्रालय गाठल्यानंतर अर्धनग्न मोर्चाचे रुपांतर नग्न मोर्चामध्ये होईल', असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर मोर्चा काढला आहे. नुकतेच त्यांनी पनवेल तालुक्यातील दांडफाटा येथे प्रवेश केला आहे. सोमवारी हा अर्धनग्न मोर्चा मंत्रालयावर धडकणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी शासनच्या विरोधात घोषणाबाजी करीत आपला निषेध व्यक्त केला.

काय आहे नेमकं प्रकरण?

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जमीन संपादित करताना दलालांना झूकते माप दिले गेले, त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सातारा जिल्ह्यातील केसुर्डी, धनगरवाडी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, मावशी, मोर्वे, भादे, अहिरे गावातील जवळपास ५० शेतकरी १२ जानेवारी पासून खंडाळा येथील तहसिल कार्यालयापासून अर्धनग्न अवस्थेत पायी चालत मंत्रालयाकडे निघाले आहेत. मऔविमचा टप्पा १, २ आणि ३ मधील प्रकल्पग्रस्त आणि खातेदार १० वर्षांपासून जमीन संपादनाविरोधात लढा देत आहेत. वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, शासन दखल घेत नसल्याने अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला असल्याची महिती शेतकऱ्यांनी दिली. जुलै २०१७ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मऔविम मुंबई यांचे सोबत बैठक घेण्यात आली होती. परंतु, त्यानंतरही या मागण्या प्रलंबित ठेवल्यामुळे अर्धनग्न मोर्चा काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी आंदोलक शेतकरी प्रमोद विठ्ठल जाधव यांनी सांगितले की, ‘सात गावांतील खातेदारांची जमीन मऔविम यांनी वगळावी ही आमची प्रमुख मागणी आहे’. या पनवेलच्या स्थानिकांनी या शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले. ‘आपणास काहीही मदत लागल्यास आम्ही आपल्या मागे सावलीसारखे उभे आहोत’, असे स्थानिकांनी शेतकऱ्यांना सांगितले. येत्या सोमवारी हा मोर्चा मंत्रालयावर धडकल्यानंतर अर्धनग्न न राहता अंगावरील सर्व कपड्यांचा त्याग करून मंत्रालयात घुसणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ‘आमचा हा मोर्चा नग्न मोर्चा होता. मात्र, महाराष्ट्राच्या रस्त्यावरून चालताना आमच्या आई-बहिणी या रस्त्यावरून वावरत असतात, त्यामुळे मंत्रालय गाठल्यानंतर अर्धनग्न मोर्चाचे स्वरूप नग्न मोर्चामध्ये बदलेल’, असे आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -