घरताज्या घडामोडीRTE अंतर्गत मोफत शाळा प्रवेशाला सुरुवात; 'लॉटरी’ द्वारे निवड झालेल्यांना प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत...

RTE अंतर्गत मोफत शाळा प्रवेशाला सुरुवात; ‘लॉटरी’ द्वारे निवड झालेल्यांना प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत वेळ

Subscribe

३० जूननंतर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर संधी देण्यात येणार आहे.  

शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE) अंतर्गत खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. त्यानुसार सन २०२१-२२ या वर्षाकरता ७ एप्रिलपासून ‘लॉटरी’ काढण्यात आली. ‘लॉटरी’द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया ११ जूनपासून सुरु करण्यात आली. ‘लॉटरी’द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ३० जूनपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर संधी देण्यात येणार असल्याचे महापालिका शिक्षण विभागाद्वारे सांगण्यात आले आहे.

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरता आर. टी. ई. अंतर्गत ज्या बालकांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे, त्यांनी ११ ते ३० जून या कालावधीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्याबरोबर घेऊन जाऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाद्वारे पालकांना करण्यात आले आहे. प्रवेश घेण्याबाबत पालकांनी नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर शाळेकडून मेसेज पाठवण्यात येणार आहे. परंतु, पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता student.maharashtra.gov.in या ‘RTE’ पोर्टलवरील ‘Application Wise Details’ (अर्जाची स्थिती) यावर क्लिक करुन प्रवेशाचा दिनांक पहावा व त्याच दिवशी शाळेत जावे, असेही शिक्षण विभागाद्वारे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे निवड यादीतील मुलांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे किंवा अन्य कारणांनी शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसल्यास त्यांना शाळेशी संपर्क करून ईमेल किंवा अन्य माध्यमांद्वारे प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु, ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करण्यात अपयश आल्यास निवड यादीतील संबंधीत पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -