घरCORONA UPDATEमुंबई सीआरपीएफ जवानांच्या ताब्यात द्या; महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्याची मागणी

मुंबई सीआरपीएफ जवानांच्या ताब्यात द्या; महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्याची मागणी

Subscribe

कोरोना मोठ्या प्रमाणात समाजात पसरत असूनही अनेक भागात नागरिक बेफिकिरीने वागत आहेत. त्यामुळे मुंबईत तातडीने केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) नियुक्त करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याची गरज आहे

मुंबईची परिस्थिती अक्षरशः हाताबाहेर चालली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यात महापालिकेची यंत्रणा सपशेल अपयशी ठरते आहे. कोरोना मोठ्या प्रमाणात समाजात पसरत असूनही अनेक भागात नागरिक बेफिकिरीने वागत आहेत. त्यामुळे मुंबईत तातडीने केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) नियुक्त करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याची गरज आहे, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल व पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडे केली आहे.

कोरोनाबाधित रूग्णांनी पालिका आणि खासगी रूग्णालयांमध्ये गर्दी होवू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला कोरोनाची लागण होवूनही त्याला रूग्णालयात खाट उपलब्ध होत नाही. रूग्णालयात जागा मिळत नसल्याने रूग्णांचे रस्त्यावरच मृत्यू होत आहेत. ही महापालिकेची मोठी नामुष्कीच नाही तर मोठे अपयशही आहे. मुंबईतील विविध भागातील महापालिका आणि खासगी रूग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत? कुठे आहेत? कुणाला काहीच माहीत नाही? त्यामुळे महापालिकेने प्रत्येक रूग्णालयातील रूग्णांची संख्या आणि खाटांची उपलब्धता याची माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, अशी सूचना रवी राजा यांनी केली आहे.

- Advertisement -

खासगी रूग्णालयात ८० टक्के खाटा कोरोना आणि इतर रूग्णांसाठी ठेवणे सरकारने बंधनकारक केले आहे. तसेच सरकारी दरानुसार उपचार करणार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी २० टक्के खाटा गरिबांसाठी ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, ती अट खासगी रूग्णालये पाळत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. खासगी रूग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने प्रत्येक परिमंडळाच्या अतिरिक्त आयुक्तांवर जबाबदारी सोपवावी. अन्यथा सामान्य नागरिकांची या रूग्णालयांमार्फत लूट सुरूच राहाण्याची भीती राजा यांनी व्यक्त केली आहे.

चाचण्यांच्या नियमांकडेही दुर्लक्ष

संशयित रूग्णांचीच चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, या नियमांचे पालन होत नाही.  कोळीवाडा परिसरातील प्रांजल सोसायटीत ०६ मे रोजी एक संशयित रूग्ण होता. त्याची चाचणी करण्याची मागणी रहिवाशांनी केली होती. महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. १९ मे रोजी या सोसायटीत तब्बल १५ पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत. मुंबईत अनेक भागात असे प्रकार घडत असून लोक निदर्शनास आणून देवूनही महापालिकेकडून याला प्रतिबंध केला जात नाही, असे राजा यांनी निदर्शनास आणून देत अनेक दवाखान्यांमध्ये चाचण्यांसाठी सामुग्री उपलब्ध नसल्याचा दावा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -