घरमुंबईभिवंडीत पतीने व्हॉट्सअॅप मेसेजवर दिला ट्रिपल तलाक

भिवंडीत पतीने व्हॉट्सअॅप मेसेजवर दिला ट्रिपल तलाक

Subscribe

भिवंडीत पतीने हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चक्क व्हॉट्सअॅपवरुन तलाक-तलाक-तलाक अशा मेसेजच्या माध्यमातून ट्रिपल तलाक देण्याचा प्रकार समोर आला आहे.

एकीकडे मुस्लिम महिलांना दिलासा मिळावा या करता ट्रिपल तलाक बंदीसाठी मोदी सरकार विधेयक आणून संसदेत कायदा करत आहे. तर दुसरीकडे पतीने हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चक्क व्हॉट्सअॅपवरुन तलाक-तलाक-तलाक अशा मेसेजच्या माध्यमातून ट्रिपल तलाक देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस स्थानकात तसेच महिला मंडळात धाव घेतली आहे. पीडित महिलेने पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नदीम शेख असे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तलाक देणाऱ्या पतीचे नाव असून त्याचे पाच वर्षांपूर्वी, २०१४ ला आरजू शेख या पायाने अधू असणाऱ्या युवतीसोबत निकाह झाला होता. त्यांना चार वर्षाचा मुलगाही आहे. पती नदीम शेख टेक्निकल इंजिनीअर म्हणून कल्याणमध्ये काम करतो. तर पीडित महिला ही पायाने अपंग असून घरकाम करते. मात्र अशा परिस्थितीत या महिलेला ट्रिपल तलाक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देण्यात आल्याने महिलेला धक्का बसला असून पीडितेने पोलीस ठाण्यात तसेच महिला मंडळात तक्रार नोंदवली आहे.

सासरच्यांचा छळ सहन करूनही टिकवला संसार 

पीडित महिला आरजू शेख (वय २३, रा. दिवनशाहा दर्गा) हिचा १८ मे २०१४ रोजी नदीम याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून आरजूच्या आई-वडिलांनी जावई नदीम यांस १० हजार ०५१ रुपये रोख तसेच संसारोपयोगी वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर पीडित महिलेचा पती व तिच्या सासरच्या मंडळींनी छळ करायला सुरुवात केली. तू पसंद नसल्याचं कारण देत तिला शिवीगाळ करून मारझोड नेहमीची झाली. त्यासोबतच नदीम हा तिच्या चारित्र्यावर संशयही घेत असे. मात्र एवढा त्रास सहन केल्यानंतरही पीडित महिलेने पाच वर्ष आपला संसार टिकवून ठेवला. नदीम आणि आरजू यांना एक चार वर्षाचे गोंडस मुलगा आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून नदीमने फ्लॅट घेण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी करण्यास सुरवात केली. परंतू ते न देऊ शकल्याने पीडित महिलेला बेदम मारहाण करून तिला घरातून बाहेर काढून देण्यात आले. तसेच महिलेला व्हॉट्सअॅपवर ट्रिपल तलाक देऊन तलाक झाल्याचे सांगितले गेले. हे शब्द तिने व्हॉट्सअॅपवर पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली यानंतरही महिलेने पतीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतू नदीमने आपले तलाक झाले असल्याचे सांगत संपर्क टाळण्यास सुरवात केल्याने पीडित महिलेने न्यायाची अपेक्षा करत पोलीस स्टेशन तसेच महिला मंडळात धाव घेतली. मात्र अजूनही या महिलेची दखल कोणीही घेतली नाही, हे दुर्दैव.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -